पाणी फक्त पिण्यासाठी व फळबागांसाठी
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी लाभक्षेत्रात यंदा तीव्र उन्हाळा आणि अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे मोठे जलसंकट निर्माण झाले आहे. कुकडी प्रकल्पाचे उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन रद्द करून उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी व फळबागांसाठी देण्याचा निर्णय झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उन्हाची तीव्रता अद्यापही कायम असून पावसानेही पाठ फिरवल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. 24 मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाले असले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या असून उन्हाळी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत.
शेतकऱ्यांना कुकडीचे दुसरे आवर्तन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र जलसंपदा विभागाने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन आवर्तनाला कात्री लावली आहे. विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 मेपासून सुरू करण्यात आलेले आवर्तन केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आणि फळबागांसाठी मर्यादित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांसाठी पाण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांमध्ये घोर निराशा पसरली आहे.
पहिल्या आवर्तनातही अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित पाणी मिळाले नव्हते. केवळ चारा ओला होईल इतकेच पाणी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. आता दुसऱ्या आवर्तनातही शेतीपिकांना पाणी नाकारल्याने शेतकरी वर्ग पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.दरम्यान, उष्णतेमुळे कालव्यांमधील आणि जलसाठ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने जनावरे आणि पिकांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून उन्हाळी पिकांसाठीही पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा कुकडीच्या आवर्तनाच्या प्रश्नावर शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाणी उशाला अन् कोरड घशाला
कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी वाटपाच्या धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आठमाही धोरण असतानाही पाणी वितरणाचे स्पष्ट व न्याय्य नियोजन होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. करमाळा, कर्जत आणि कोळवडी भागातून पाणी पुढे गेल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यात पाणी पोहोचेपर्यंत अनेक ठिकाणी पिके व फळबागा कोमेजून जात असल्याचे वास्तव असल्याचे शेतकरी सांगतात.










