कोतवाली पोलिसांची केली तरुणाची सुटका
अहिल्यानगर / नगर व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी एका सावकाराने मालकाच्या अनुपस्थितीत त्याच्या कामगाराला बेदम मारहाण करून घरात डांबून ठेवल्याची खळबळजनक घटना स्टेशन रोड परिसरातील आनंदनगर येथे घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तातडीने धाव घेत कुलूप तोडून पीडित तरुणाची सुटका केली आहे. शंभुलाल गोबालजी भिल (वय २२, मूळ रा. राजस्थान) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून दीपक लाल गुगळे (रा. आनंदधाम, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंभुलाल भिल हा भगवानलाल गुजर यांच्या चायनीज गाडीवर काम करतो. गुजर यांनी संशयित दीपक गुगळे याच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. मागील दोन महिन्यांचे व्याज न दिल्याने गुगळे हा संतापलेला होता. शुक्रवारी दुपारी मालक घरी नसताना गुगळे तिथे पोहोचला व त्याने शंभुलालला मालकाबाबत विचारणा करत शिवीगाळ सुरू केली. शंभुलालने विरोध केला असता, गुगळे याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरात ढकलले.
त्यानंतर गुगळे याने बाहेरून स्वतःचे कुलूप लावून शंभुलालला घरात कोंडून ठेवले आणि तेथून पळ काढला. पीडित तरुणाने आरडाओरडा केल्यावर सोबतच्या कामगाराने मालक गुजर यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घराचे कुलूप तोडले व तरुणाची सुटका केली. या घटनेमुळे शहरात खाजगी सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलीस हवालदार वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
वीज ग्राहकाचा कर्मचार्यांवर हल्ला
अहिल्यानगर: थकीत वीज बिल भरण्यास सांगितल्याच्या रागातून एका इसमाने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून महिला कर्मचार्यासह इतर कर्मचार्यांना शिवीगाळ करत दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गंजबाजार येथील जुने पॉवर हाऊस परिसरातील महावितरण कार्यालयात दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गंजबाजार सेशनमधील एका ग्राहकाचे मागील ५ ते ६ महिन्यांपासून वीज बिल थकीत होते. वारंवार सूचना देऊनही बिल न भरल्याने नियमानुसार त्यांचे वीज कनेशन तोडण्यात आले होते. याचाच राग मनात धरून तुषार सुंदर देठे (रा. धरती चौक, अहिल्यानगर) हा इसम कार्यालयात आला. त्याने तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला वरिष्ठ तंत्रज्ञ आणि इतर कर्मचार्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. संबंधित महिला कर्मचार्याने तक्रार विचारली असता, आरोपीने त्यांना अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. कार्यालयातील इतर कर्मचारी मध्यस्थी करण्यासाठी आले असता, आरोपीने त्यांच्या अंगावर दगड घेऊन धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
मैत्रिणीच्या घरी गेलेल्या मुलीचे दागिने चोरीला
अहिल्यानगर: शहराच्या नालेगाव भागातील कवडे गल्ली येथे अभ्यासासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीच्या बॅगेतून सोन्याची चैन आणि कर्णफुले चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उषा प्रदिप डागवाले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, उषा डागवाले यांची नात वर्षा चौधरी ही २२ फेब्रुवारी रोजी दुपारी नालेगाव येथील खंडागळे वाड्यात राहणार्या आपल्या सानिया शेख नावाच्या मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेली होती. अभ्यासादरम्यान घाम येत असल्याने वर्षाने गळ्यातील दीड तोळा सोन्याची चैन आणि अर्धा तोळा वजनाचे कर्णफुले काढून बॅगेतील पाऊचमध्ये ठेवले होते. काही वेळानंतर ती घराबाहेर गेली असता, तेथे उपस्थित असलेल्या महिलेने संधी साधून हे दागिने चोरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.संध्याकाळी घरी परतल्यानंतर वर्षाला बॅगेत दागिने मिळून आले नाहीत. घाबरलेल्या अवस्थेत तिने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही, मात्र आजीने विचारपूस केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ८० हजार रुपये इतकी आहे.
अपघातात महिलेचा मृत्यू; मुलगा जखमी
अहिल्यानगर ः नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात भरधाव वेगाने जाणार्या एका अज्ञात कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांचे नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमोल रावसाहेब रासकर यांची आई आणि चुलत मामा दत्तात्रय आगरकर हे आपल्या दुचाकीवरून चास येथून अहिल्यानगरच्या दिशेने जात होते. यावेळी हेमराज फार्म्ससमोर पाठीमागून येणार्या महिंद्रा एसयुव्ही ४०० कारच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अविचाराने आणि हयगयीने चालवून दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत फिर्यादीच्या आईचा जागीच मृत्यू झाला, तर मामा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी किंवा दवाखान्यात नेण्याऐवजी आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार जायभाय हे करीत आहेत.










