टाकळी ढोकेश्वर-निवडुंगेवाडी रस्ता खड्ड्यात
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ते निवडुंगेवाडी दरम्यानचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुमारे वीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवडुंगेवाडी ग्रामस्थांनी आमदार दाते यांच्याकडे केिली आहे.
टाकळी ढोकेश्वर ते निवडुंगेवाडी हा परिसरातील प्रमुख संपर्क मार्ग असून, या रस्त्यावरून दररोज ग्रामस्थ, शेतकरी, विद्याथ आणि विविध वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र गेल्या काही वर्षांत रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना दैनंदिन प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णवाहिका, दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनाही या रस्त्यावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले. या पार्श्वभूमीवर आमदार दाते यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी करून शासन स्तरावर पाठपुरावा करावा तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडुंगे, गंगाधर निवडुंगे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश पायमोडे, युवा नेते विक्रम झावरे व ओंकार (बबलू) झावरे यांनी आमदार काशिनाथ दाते यांना मागणीचे निवेदन दिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, भगवंत थोपटे गुरुजी, माजी चेअरमन बबनराव पायमोडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, माजी सरपंच शिवाजी खिलारी, बाजार समितीचे माजी उपसभापती विलास झावरे, अक्षय गोरडे, बापू रांधवण, आबा धुमाळ, संपत धुमाळ, अंकुश धुमाळ, महादू झावरे, संकेत थोपटे, दीपक ढूस, नितीन धुमाळ, महेश धुमाळ, पोपट धुमाळ, रविंद्र पायमोडे, जालिंदर बांडे, प्रवीण थोपटे, विष्णू निवडुंगे, पवन निवडुंगे, राहुल धुमाळ, सतीश निवडुंगे, शहाजी पायमोडे, निलेश चव्हाण, गणेश चव्हाण यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, धुमाळ वस्ती व निवडुंगेवाडी येथील युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना
टाकळी ढोकेश्वर ते निवडुंगेवाडी हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने याची तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून काम हाती घ्यावे.
– दत्तात्रय निवडुंगे, ग्रामपंचायत सदस्य










