श्रीगोंदा पोलीस ठाण्यात साईसेवा पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
‘ठेवी सुरक्षित, परतावा हमखास’ अशा गोड आश्वासनांनी नागरिकांची आयुष्यभराची बचत गोळा करणाऱ्या एका पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणाने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चेअरमन, संचालक आणि पदाधिकाऱ्यांसह 21 जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काष्टी येथील साई सेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आणि संबंधित क्रेडिट सोसायटीविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत फसवणूक, विश्वासघात, आर्थिक गैरव्यवहार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंधक कायद्यान्वये विविध कलमे लावण्यात आली आहेत. त्यामुळे हा प्रकार केवळ ठेवी अडकण्यापुरता मर्यादित नसून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे.
तक्रारीनुसार, पतसंस्थेकडून जादा व्याजाचे आमिष दाखवत नागरिकांकडून बचत ठेवी, फिक्स डिपॉझिट आणि विविध योजनांमधून लाखो रुपये जमा करून घेण्यात आले. मात्र, मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीदार पैसे मागण्यासाठी गेल्यावर उद्या या, फाईल झाली नाही, ऑडिट सुरू आहे, अशी कारणे देत टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात काही ठेवीदारांचे 4 लाख, 10 लाख, 14 लाख तर काहींचे तब्बल 21 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार अडकले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अनेक कुटुंबांनी लग्नसमारंभ, शेती, शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी साठवलेली रक्कम अडकून पडल्याने ठेवीदारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
विशेष म्हणजे, 2020 ते 25 मे 2026 या कालावधीत हा कथित गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून ठेवी जमा करा आणि वेळ आली की पैसे मिळणार नाहीत, असा प्रकार सुरू होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान, या कारवाईमुळे तालुक्यातील इतर पतसंस्था आणि आर्थिक संस्थांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पुढचा नंबर कुणाचा? अशी चर्चा गावोगावी सुरू झाली आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, ठेवीदारांकडून अजूनही तक्रारी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










