पुणे / नगर सह्याद्री :
पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रविवारी रात्री उशिरा नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरच्या विजयाने संपला. हर्षवर्धनने सोलापूरच्या ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाडचा ४-३ अशा अटीतटीच्या फरकाने पराभव करत ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान मिळवला. मात्र, विजयाचा गुलाल उधळला जात असतानाच हर्षवर्धनने कुस्तीतून निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच अवाक केले.
मैदानावरील अटीतटीचा संघर्ष –
कुस्तीच्या सुरुवातीला महेंद्र गायकवाडने आक्रमक पवित्रा घेतला होता. महेंद्रने हर्षवर्धनला बाहेर ढकलत १ गुण मिळवला. त्यानंतर महेंद्रला ताकीद देऊनही नियमानुसार खेळ न केल्याने हर्षवर्धनला १ गुण मिळाला आणि पहिल्या ३ मिनिटांनंतर सामना १-१ असा बरोबरीत होता. दुसऱ्या फेरीत महेंद्रला ‘अॅक्टिव्हिटी पिरियड’ देण्यात आला, मात्र त्यात गुण न मिळाल्याने हर्षवर्धनला पुन्हा १ गुण मिळाला. अनुभवी हर्षवर्धनने आपली पकड मजबूत करत ४ गुणांची आघाडी घेतली. शेवटच्या क्षणी महेंद्रने १ गुण मिळवला, पण तोपर्यंत हर्षवर्धनने ४-३ ने विजयावर शिक्कामोर्तब केले होते.
चांदीची गदा अन् निवृत्तीचा धमाका!
कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते चांदीची गदा आणि पुरस्कार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धनने उपस्थितांना धक्का दिला. गदा खांद्यावर घेऊन अवघ्या १२ मिनिटांतच त्याने “मी कुस्तीतून निवृत्त होत आहे”, अशी घोषणा केली.
“सरकारने मला नोकरी दिली नाही…”
निवृत्ती जाहीर करताना हर्षवर्धनने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. तो म्हणाला, “मी सरकारकडे नोकरीसाठी, गेलो होतो, पण या सरकारने मला नोकरी दिली नाही.” आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत त्याने चाहत्यांचे आभार मानले. एका बाजूला दोनदा महाराष्ट्र केसरी होण्याचा आनंद आणि दुसरीकडे एका महान मल्लाने घेतलेली अनपेक्षित निवृत्ती, यामुळे कुस्ती क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी गदेचा मानकरी अखेर नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत हर्षवर्धनने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर ४-२ अशा गुणफरकाने मात केली. या विजयासह हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरीच्या इतिहासातील सातवा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ (दोनदा जेतेपद मिळवणारा) मल्ल ठरला आहे.
अंतिम लढतीचा थरार: कसा झाला विजय?
अंतिम लढतीच्या पहिल्या हाफमध्ये महेंद्र गायकवाडने आक्रमक सुरुवात करत १ गुण मिळवला होता. त्यानंतर हर्षवर्धनने १ गुण घेत बरोबरी साधली. पहिल्या हाफअखेर सामना १-१ असा बरोबरीत होता. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्रला ‘अॅक्टिव्हिटी टास्क’ देण्यात आला, मात्र त्यात गुण मिळवता न आल्याने हर्षवर्धनला १ गुण मिळाला. त्यानंतर हर्षवर्धनने ताबा मिळवत आणखी २ गुण वसूल केले आणि ४-१ अशी भक्कम आघाडी घेतली.
चांदीच्या गदेसह ‘फॉर्च्युनर’वर कोरलं नाव –
शेवटच्या काही सेकंदात हर्षवर्धन मॅटच्या बाहेर गेल्याने महेंद्रला १ गुण मिळाला, मात्र वेळ संपली तेव्हा गुणफलक ४-२ असा हर्षवर्धनच्या बाजूने होता. प्रतिष्ठेच्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरणाऱ्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला ऐतिहासिक विजयानंतर अत्यंत मौल्यवान बक्षिसे प्रदान करण्यात आली आहेत. आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या वतीने विजेत्या हर्षवर्धनला मानाची चांदीची गदा, ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि आलिशान ‘फॉर्च्युनर’ गाडी देण्यात आली आहे.
महेंद्रने सिकंदरला रोखलं, तर हर्षवर्धनने जयला लोळवलं
अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही मल्लांनी कडवी झुंज दिली होती. माती विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेखचा ३-० असा पराभव करून सर्वांना चकित केले. पहिल्या हाफमध्येच महेंद्रने घेतलेली आघाडी सिकंदरला तोडता आली नाही. दुसरीकडे, गादी (मॅट) विभागाच्या अंतिम फेरीत हर्षवर्धन सदगीरने सोलापूर शहराच्या जय पाटीलवर १०-० असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती.
महेंद्र गायकवाडला पुन्हा हुलकावणी पण ‘स्कॉर्पिओ’वर कोरलं नाव –
सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या महेंद्र गायकवाडला पुन्हा एकदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी त्याला शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता, तर यंदा हर्षवर्धन सदगीरने त्याचे स्वप्न भंगवले. अंतिम फेरीत कडवी झुंज देणाऱ्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला जरी किताबाने हुलकावणी दिली असली, तरी त्यालाही मोठ्या बक्षिसाने गौरवण्यात आले आहे. उपविजेता ठरलेल्या महेंद्रला ‘स्कॉर्पिओ’ गाडी आणि ४ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.










