पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील देवीभोयरे येथील अष्टभुजा अंबिका माता देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार आहे. पारनेर येथील संपर्क कार्यालयात आमदार काशिनाथ दाते यांनी देवस्थानला ‘ब’ दर्जा वर्ग मिळाल्याचे पत्र देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, उपाध्यक्ष संपतराव वाळुंज, माजी उपसरपंच विकास सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक गाजरे गुरुजी व विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया देवीभोयरे ग्रामस्थ व भाविकांनी व्यक्त केली आहे. अंबिका देवस्थान, देवीभोयरे ग्रामस्थ व अंबिका देवीच्या राज्यातील भाविकांच्यावतीने आ. दाते यांचा सत्कार करून त्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
गेली अनेक वर्षांपासून अंबिका देवस्थान ट्रस्ट, देवीभोयरे ग्रामस्थ व मुंबईकर पुणेकर मंडळ व राज्यातील भाविकांनी देवस्थानला ‘ब’ दर्जा देण्याची मागणी संबंधित मंत्र्यांकडे केली होती. आमदार दाते यांनी नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी देवीभोयरे येथे आले होते. त्याचवेळी देवस्थानला ‘ब’ दर्जा देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले असून शब्दाला जागणारे आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. या देवस्थानाला ब वर्ग दर्जा मिळाल्याने या ठिकाणी मोठमोठ्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
अंबिका माता हे राज्याचे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी वर्षभरात विविध उत्सवासाठी लाखो भक्तगण राज्यातून मोठ्या संख्येने येत असतात मात्र सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांना मुक्कामी थांबता येत नव्हते. ब वर्ग दर्जा मिळाल्याने भक्तीनिवासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. तसेच देवीभोयरे गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्याची कामे लवकर माग लागणार आहे, यासाठी हा ब वर्ग दर्जा अतिशय महत्त्वाचा आहे. भाविक, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ, पुणेकर मंडळ तसेच देवस्थान यांनी याबद्दल राज्य मंत्रिमंडळाला धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले. देवीभोयरे परिसरात बुधवारी देवीचा अभिषेक करून पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, उपाध्यक्ष संपतराव वाळुंज, माजी उपसरपंच विकास सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक गाजरे गुरुजी, गोपीचंद बेलोटे, बाबुराव मुळे, शहाजी बेलोटे, जगन्नाथ बेलोटे, अक्षय बेलोटे, दत्तात्रय बेलोटे, विजय बेलोटे, मेजर कमलाकर बेलोटे, नारायण माळी, रामदास बेलोटे, बबन बेलोटे, हर्षद झावरे, संजय बेलोटे, दिनेश गायकवाड, संतोष केदारी, शरद बोरुडे, सुभाष बेलोटे, ताराचंद गाजरे, सीताराम आरोटे, भाऊसाहेब बेलोटे, भाऊसाहेब सरडे, विश्वनाथ बेलोटे, ज्ञानदेव बेलोटे, साहेबराव गुंड, गणेश बेलोटे, अतुल मुळे, राहुल केदारी, अजिंक्य बेलोटे, संतोष आरोटे, प्रमोद मोरे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.










