अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
राज्यातील प्रसिद्ध समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग करणार्या २ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ लाख ८९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी गावात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यासह राजकीय,धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्न ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाच्यावेळी महिलेचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होतेे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सागर सुरेश कांबळे याने साथीदारासह केला असून, तो सोन्याची वाटणी करण्यासाठी मोटार सायकलवर ममदापूर फाटा येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने ममदापूर फाटा येथे जाऊन सापळा रचला. यावेळी सागर सुरेश कांबळे (वय ३२, रा. रमानगर वॉर्ड नं.१, श्रीरामपूर), बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय ३६, रा. वॅार्ड नं.२ श्रीरामपूर) यांना पकडण्यात आले.त्याने सदरचा गुन्हा इतर साथीदार आतिक आयुब उर्फ आरीफ शेख, सनी विलास ढोकणे (रा.वार्ड नं.२ श्रीरामपूर (फरार) अशांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून १ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचे ११.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, ७० हजारांचे दोन मोबाईल, ७० हजार किमतीची मोटार सायकल, असा एकूण २,८९,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून, पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहे.










