नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
गेल्या अनेक दिवसापासून लोकसभा खासदारांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
केंद्र सरकारने लोकसभा सदस्य संख्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आता लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत केंद्र सरकारने ‘मिशन २०२९’अंतर्गत राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. जागा वाटपासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी बैठक घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बीजेडी, शिवसेना आणि वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत बैठका झाल्या. विधेयकावर एकमत घडवून आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. विधेयकावर एकमत झाल्यानंतर विधानसभा, लोकसभेच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
महिला खासदारांची संख्या 273
सत्ताधारी एनडीएकडे आवश्यक संख्याबळ नाही, त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेसाठी सरकारकडून सर्वपक्षीय सहमती तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 816 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यात महिला खासदारांची संख्या 273 वर पोहोचणार आहे.यासाठी 2011 ची जनगणना महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेश १२०, महाराष्ट्र ७२, पश्चिम बंगाल ६३ आणि बिहार ६० अशा प्रमाणात जागा वाढतील.
महाराष्ट्रात किती आमदार वाढणार ?
महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत हालचाली सुरु आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा 48 वरून 72 आणि विधानसभा जागा-288 वरुन 432 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेसाठी २०११ ची जनगणना आधार मानून राज्यांमधील जागांचे सध्याचे गुणोत्तर कायम राखले जाणार आहे. लोकसभेत बहुमताचा आकडा २७२ वरून थेट ४०९ वर पोहोचणार आहे.










