मालवाहतूक वाहनाची दुचाकीला धडक
पाथर्डी| नगर सह्याद्री
तालुक्यातील मिरी-पांढरीपूल रस्त्यावरील गाले वस्ती परिसरात सोमवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिरी येथून नगरच्या दिशेने जाणारी दुचाकी आणि नगरकडून तिसगावच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू चारचाकी वाहन यांच्यात गाले वस्ती परिसरात समोरासमोर भीषण धडक झाली. मालवाहू वाहन चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येत भरधाव वेगात दुचाकीला धडक दिल्याचे प्रत्यक्षदशनी सांगितले.
या भीषण अपघातात सुनील रावसाहेब झाडे (रा. रेणुकाईवाडी, ता.पाथर्डी) यांचा जागीच मृत्यू झाला. ते नगर येथील एका विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली.
अपघातानंतर चारचाकी वाहन चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेनंतर रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली असून काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच मिरी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी भगवान टकले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पंचनामा करून मृतदेह माऊली जनसेवा फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.










