श्रीरामपूर | नगर सह्याद्री
मागील वादातून पेट्रोलपंपावर लोखंडी हातोडा व विटेने हल्ला करून मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणार्या तिघा आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपींना ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे.
याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४०/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील फिर्यादी नवनाथ अशोक जाधव यांच्यावर आरोपी शिवाजी शंकर वने, शंकर बाबुराव वने आणि चैतन्य दिलीप वने (सर्व रा. भेर्डापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांनी जुन्या वादाच्या कारणावरून इंडियन ऑईल पेट्रोलपंप, भेर्डापूर येथे लोखंडी हातोडा व विटेने हल्ला केला होता. तसेच शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार सहाय्यक फौजदार अर्जुन भैरू बाबर यांनी प्रकरणाचा सखोल तपास करत वस्तुनिष्ठ व भौतिक पुरावे गोळा केले. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, श्रीरामपूर येथे आरसीसी क्रमांक ४७१/२०२२ अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्यादरम्यान फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अंमलदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. पुरावे व साक्षींच्या आधारे मा. विजया काटकर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, श्रीरामपूर यांनी दिनांक ४ मे २०२६ रोजी तिन्ही आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. धुमाळ यांनी काम पाहिले, तर श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या कोर्ट पैरवी अधिकार्यांनी पाठपुरावा केला.










