तहसील कार्यालयासमोर सोमवारी जोरदार निदर्शने
शेवगाव | नगर सह्याद्री
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असून महागाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. केंद्र सरकारने तातडीने इंधन दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली.
पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 1 जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार शेवगाव येथे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर सोमवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान बोलताना लांडे म्हणाले की, अवघ्या आठ दिवसांत चार वेळा इंधन दरवाढ करण्यात आली असून पुढील काळातही दरवाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवगय कुटुंबांवर होत आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त असताना इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होऊन नागरिकांचे जगणे अधिक कठीण बनले आहे. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी तहसीलदार आकाश दहाडदे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढीव किमती तातडीने मागे घेण्यात याव्यात, वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी सवलतीच्या दरात आवश्यक तेवढे डिझेल उपलब्ध करून द्यावे तसेच खतांचा पुरवठा स्वस्त दरात करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.या आंदोलनात कॉ. विनोद मगर, लाल बावटा रिक्षा शिक्षण युनियनचे अध्यक्ष राज गायकवाड, सूर्या निकाळजे, शंकर काथवटे, कॉ. संदीप इथापे, कॉ. बापूराव राशिनकर, कॉ. बबनराव पवार, कॉ. विष्णू गोरे, कॉ. भिवा घोरपडे, कॉ. ड. गणेश ताठे, कॉ. बबन ताठे, कॉ. आत्माराम उगले, कॉ. गोरक्ष सरोदे, अनिश खतीब आदी सहभागी झाले होते.










