आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी, शर्ती लागू
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील देसवडे येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत कर्जमाफी आदेशाची होळी करत आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी, शर्ती लागू करण्यात आल्या असून त्यातातडीने रद्द झाल्या पाहिजे. यावेळची कर्जमाफी आजपर्यंतच्या सर्व कर्जमाफीमध्ये सर्वात कडक अटी शर्तीअसलेली व खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे. त्यासाठी सरकारने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, अशा मागण्या करत कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात भूमिपूत्र शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
शेतकऱ्यांच्या या फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून तो राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत असल्याचा दावा यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी केला आहे.
कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या अटी रद्द करा तसेच सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी किसान सभेची मागणी आहे. सरकारने कर्जमाफी करताना, 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेले शेतकरी, जरी ते यावेळी थकित असले तरी त्यांना केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यांनाही किमान दोन वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट टाकण्यात आली आहे.
अत्यल्प पगारावर राबणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. निवडणुकीपूव शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि आता 2 लाख कर्ज माफ करणार सांगून बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ 50 हजारावर बोळवणूक करायची ही अत्यंत संतापजनक गोष्ट असून ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक असल्याची टीका भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी केली.कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी रद्द करा. सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. नियमित कर्जदार शेतकरी, शेड नेट, पॉली हाऊस शेतकरी, कुक्कुट पालन शेतकरी यांच्यासह सर्व पीक व शेती सुधारणा कर्ज माफ करा, आदी मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, सरपंच पोपट दरेकर, चेअरमन संतोष टेकुडे, विशाल वाडेकर, ठमाजी भोर, रावसाहेब फटांगरे, काशिनाथ गोळे, मंजाबापू वाडेकर,पंडित गागरे, साहेबराव भोर, शंकर भोर, अजित वाडेकर, राहुल पारधी, देविदास टेकुडे, किरण फटांगरे, तेजस फटांगरे, हर्षद वाडेकर, गणेश फटांगरे, बाळासाहेब वाडेकर, पप्पू वाडेकर, भाऊसाहेब दरेकर, एकनाथ फटांगरे, नवनाथ जाधव, सुरेश दरेकर, सचिन खाडे, साहेबराव वाडेकर, उपसरपंच सचिन भोर, शांताराम भोर, बाबासाहेब वाडेकर, पोपट फटांगरे, शंकर टेकुडे, दत्ता फटांगरे, बबन भोर, सचिन घेमूड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते










