श्री निवृत्तिनाथांच्या पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तीनाथ दिंडी सोहळा सोमवारी (दि.13) सायंकाळी साकतखुर्द (ता. नगर) येथे सायंकाळी दाखल झाला. पालखी सोहळ्याचे साकत गावात आगमन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजी तसेच पुष्पवर्षाव करत पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. हरीनामाच्या जायघोषाने साकतखुर्द दुमदूमले. दिंडीचे आगमन झाल्यानंतर साकतसह परिसरातील भाविकांनी सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी गद केली.दरम्यान सोमवारी सकाळपासूनच साकत खुर्द येथील वातावरण भक्तिमय झाले होते. सायंकाळी पालखी सोहळा साकत खुर्द येथे आल्यानंतर ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले तसेच ग्रामस्थांनी पालखीला खांद्यावर घेऊन मोठ्या भक्तिभावाने गावात आणले.
यावेळी झालेल्या ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषाने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सायंकाळी पालखीचे विधिवत पूजन तसेच आरती करण्यात आली. यानंतर कीर्तन सोहळा पार पडला. यानंतर दिंडी सोहळ्यातील सर्व भाविक भक्तांना आमटी-भाकरीचा महाप्रसाद देण्यात आला. दरम्यान सालाबाद प्रमाणे अहिल्यानगर येथील दोन दिवसांच्या मुक्कामा नंतर संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम साकतखुर्द येथे असतो. या पार्श्वभूमीवर साकतखुर्द ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने सुरुवातीपासूनच मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. राज्यातील प्रमुख दिंड्यापैकी पंढरपूर येथे पहिला मान असलेली ही दिंडी महत्वपूर्ण मानली जाते. यावष सुमारे पन्नास ते पंच्चावन्न हजार वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले. दिंडी आगमनामुळे संपूर्ण साकत गावात उत्साहाचे वातावरण झाले. पालखी सोहळा यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य सेवा सोसायटीचे सर्व आजीमाजी पदाधिकारी, ग्रामस्थ, गावातील तरुण मंडळे, यांनी परिश्रम घेतले. मंगळवारी सकाळी भक्तीमय वातावरणात पुढील प्रस्थानासाठी दिंडीला निरोप देण्यात आला. पालखी मार्गांवर तात्पुरते शौचालय सुविधेसाठी सेवाभारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जिल्हा प्रशासन यांच्या पुढाकारातून याही वष निर्मल वारी उपक्रम यशस्वी झाला.

प्रशासकीय अधिकारी तळ ठोकून
साकतखुर्द येथे मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी गट विकास अधिकारी राजेंद्र देसले, अक्षय गारडे यांच्या मार्गदर्शनाखाली ड.ग.वि.अ रणजित अक्कुलवार, सारंग दुग्गम, कृषीचे सचिन चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी रेशमा कराळे, उपेंद्र पोटे, अरुण खळेकर, मनीषा दसपुते, दीपा राजळे, डॉ. यादव, सचिन थोरात, प्रशांत जगताप, अश्विनी ठुबे, संदीप तागडकर, शिंदे मनीषा, महावितरणचे अभियंता विकास दिवेकर, कांबळे यासह आशासेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले.
पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
पालखी सोहळ्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी नगर तालुका पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवऱ्यात आला. यासाठी नगर तालुका पोलीस ठाण्याचे स. पो. नि. गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नि. उमेश पतंगे, पो. उप. नि.गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महाप्रसादासाठी बनवली दोन हजार लिटर आमटी
साकत येथील आमटी भाकरी महाप्रसादाची परंपरा पालखी स्थापनेपासून अद्यापही सुरूच असून त्यास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यासाठी गावातील प्रत्येक घरातील कुटुंबाकडून शंभर भाकरी करून देण्याची परंपरा आजही टिकून आहे. लोकवर्गणीतून यावष दोन हजार लिटर आमटी बनिवण्यात आली.










