उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा कामरगाव ग्रामस्थांचा इशारा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
तालुक्यातील कामरगाव येथील पुलाजवळील अपघातग्रस्त धोकादायक वळणावर कायमस्वरूपी उपायोजना करावी, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी सरपंच तुकाराम कातोरे यांनी दिला आहे.
नगर -पुणे महामार्गावर कामरगाव येथील वालुंबा नदीवर मोठा पूल आहे. पुण्याकडे जाताना या पुलाच्या पाठीमागे तीव्र उतार व गोलाकार वळण आहे. तेथे वाहन आल्यावर चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते व वाहने नदीच्या कडेला पडतात. यापूव याच ठिकाणी तीस ते पस्तीस वाहने खाली पडली असून वाहनांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. यात विशेष करून कंटेनरसारख्या अवजड वाहनांचा समावेश आहे याच ठिकाणी पुलाच्या कडेला डाव्या बाजूकडे 50 फुटांचा खड्डा असून, तेथेही दुचाकी वाहनांचे अपघात झालेले आहे, तो खड्डा बुजविणे गरजेचे आहे तसेच पुलावरील लोखंडी कठडा पूर्ण करण्याची गरज आहे. या महामार्गावरून हजारो वाहनांची वाहतूक असून वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणाला अपघातप्रवण क्षेत्र जाहीर करावे, तेथे कायमस्वरूपी उपायोजना करावी, या मागणीसाठी मा. सरपंच तुकाराम कातोरे, प्रकाश कातोरे, बबनराव भुजबळ, बाळासाहेब शिवले, रावसाहेब कातोरे, राजेंद्र शिंदे, रमजान शेख यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अधिकारी उत्तमराव बोरुडे यांना लेखी निवेदन देऊन चर्चा केली. बोरुडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. पंधरा दिवसात उचित कार्यवाही न झाल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा मा. सरपंच कातोरे, शिंदे, जाधव, लाळगे, गायकवाड, वेताळ, संतोष शिंदे, भिंगारदिवे आदींनी दिला आहे.
काम पूर्ण झाल्यास धोका टळणार
महामार्गावर नियंत्रण ठेवणारी पर्यवेक्षीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असून ग्रामस्थांना लक्ष घालावे लागते. या वळणाचे काम पूर्ण झाल्यास महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची व वाहनांची जीवित व वित्तहानी होणार नाही व प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल.
– तुकाराम कातोरे, मा. सरपंच, कामरगाव










