- जाहिरात -spot_img
breaking news

विजय अक्षयचा अन् चर्चा सुजय विखेंची; लाखाचे मताधिक्य विरोधकांसाठी धोक्याची घंटा 

 

जिल्हा परिषदेसाठी महायुतीला पूरक वातावरण
सारीपाट / शिवाजी शिर्के –
विधानसभेच्या राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले हेच बाजी मारणार होते आणि झालेही तसेच! मात्र, त्यांना एक लाख ४० हजार ९३ मते मिळाल्याने नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील आणि त्यातही शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची पुरती बेअब्रू झाली. गोविंद मोकाटे यांना अवघी २७ हजार ५०६ मते मिळाली. त्यात महाविकास आघाडीतील नेत्यांमुळे मिळालेली मते नगण्यच! व्यक्तीगत गोविंद मोकाटे यांना त्यांचा व्यक्तीगत संपर्क, त्यांना माननारा मतदार आणि कर्डिले यांचे पारंपारीक विरोधक यांची मिळून ही मते मिळाली. अक्षय कर्डिले यांना लाखापेक्षा जास्त अधिकची मिळालेली मते खा. लंके यांच्यासाठी मोठी धोक्याची घंटा मानली जाते. याशिवाय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार करता महायुतीसाठी पोषक वातावरण तयार झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. खा. निलेश लंके यांनी मोकाटे यांच्यासाठी मतदारसंघ पिंजला असतानाही त्याचा फायदा झाला नाही. उलटपक्षी सुजय विखे पाटील यांनी स्वत:ची निवडणूक असल्यागत पायाला भिंगरी बांधली आणि लाखापेक्षा जास्त मते मिळवून दिली. त्यामुळेच या पोट निवडणुकीच्या निकालानंतर अक्षय कर्डिले यांचा विजय झाला असताना चर्चा मात्र सुजय विखे पाटलांची झाली.

प्राजक्त तनपुरे यांच्या पुनर्वसनाचं काय?
पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुेर यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. त्याआधी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी तनपुरे यांची त्यांच्या राहुरीतील वाड्यावर जाऊन भेट घेतली. मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द घेतला असल्याने आपण थांबण्याचा निर्णय घेतल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी त्याचवेळी जाहीर केले. या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मोकळीक दिली होती. याचाच दुसरा अर्थ मुख्यमंत्री- पालकमंत्री यांना दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि त्याचाच प्रत्यय लाखाच्या मताधिक्यात दिसला. आता प्राजक्त तनपुरे यांच्याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे राहुरीकरांच्या नजरा लागल्या आहेत.

सहानुभूतीतील विजयाने हुरळून जाऊ नका, पुढची वाटचाल खडतर!
अक्षय कर्डिले एकदाचे आमदार झाले. त्यांचे कर्तुत्व तसे काहीच नाही. वडिल स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर सहानुभूतीची मोठी लाट निर्माण झाली. शिवाजीरावांना माननारा स्वतंत्र वर्ग आहेच. याशिवाय भाजपातील नेतेमंडळी सर्वतोपरी रसद अक्षय यांच्यासाठी पुरवली. एक लाखापेक्षा जास्त मते त्यांना मिळाली. पुढची तीन वर्षे आमदारकी मिळाली असताना या कालावधीत संघटन वाढवणे आणि मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. याशिवाय मतदार आणि खास करुन तरुणांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत. प्राजक्त तनपुरे यांनी थांबण्याचा निर्णय जाहीर करतानाच ‘दोन पावले मागे घेतली आहेत, पुढची निवडणूक आपणच लढवणार’, असे जाहीरपणे बोलून दाखवले आहे. याचाच अर्थ अक्षय कर्डिले यांच्यासमोर तगडा उमेदवार असणार आहे. त्यामुळेच एक लाखाच्या मताधिक्याने हुरळून न जाता आजपासूनच पुढच्या निवडणुकीची पायाभरणी कर्डिले यांना करावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा :  ब्रँडेडच्या नावाखाली विषारी शॅम्पू, महिलेला लुटले, तरुणावर चाकूने हल्ला, घर फोडले...

गोविंद मोकाटे यांचा एकाकी लढा!
स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे पारंपारीक विरोधक म्हणून गोविंद मोकाटे यांचे नाव घेतले जाते. निवडणूक जाहीर होताच त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. पुढे त्यांनाच अधिकृत उमेदवार करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत पांगरमल दारुकांडात त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल झाला. त्या मुद्याची सहानुभूती मिळविण्याचा त्यांनी यावेळी प्रयत्न केला. कर्डिले यांच्या पारंपारीक विरोधकांनी मोकाटे यांना साथ दिली. याशिवाय मोकाटे यांना माननारा एक वर्ग आहेच. त्यांच्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रयत्न केले असले तरी त्यांना मिळालेली तीस हजारांच्या दरम्यानची मते ही त्यांची व्यक्तीगतच मानली जात आहेत.

… ही तर जनतेच्या अपेक्षांची सुरुवात – आ. अक्षय कर्डिले
मतदारसंघातील जनतेने टाकलेला विश्वास आणि जबाबदारी यातून स्पष्ट झाली आकहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा विजय मिळाला. माझ्या वडिलांनी केलेल्या विकासकामांची परंपरा पुढे नेत उर्वरित कामांसाठी मी दुप्पट वेगाने झटणार आहे. हा फक्त विजय नाही, तर जनतेच्या अपेक्षांची सुरुवात असल्याचे प्रतिपादन राहुरी मतदारसंघाचे भाजपाचे नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी ‘नगर सह्याद्री’ सोबत बोलताना केले.

पालकमंत्र्यांनी वाढवला जिल्हा बँकेसह जिल्हा परिषदेचा नारळ
महायुतीच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील नेत्यांनी पोटनिवडणुक असली तरी पूर्णत: गांभिर्याने घेतली. मतदानाच्या दिवसापर्यंत सर्वच नेते मंडळी ठाण मांडून होती. विशेषत: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पहिल्या दिवसापासून स्वत: मैदानात असल्यागत सर्व यंत्रणा राबवली. त्यातून यशश्री आली. या विजयाचा आणि निर्माण झालेल्या मानसिकतेचा फायदा त्यांना आता जिल्हा बँक व जिल्हा परिषद निवडणुकीत होणार हे नक्की. या दोन्ही निवडणुकांचा नारळ पालकमंत्री विखे पाटलांनी या निकालाच्या माध्यमातून वाढवला असेच दिसते.

चमत्काराच्या वल्गना हवेतच विरल्या!
पोटनिवडणुकीत आम्ही चमत्कार घडवू आणि आमचाच उमेदवार विजयी झालेला दिसेल अशा वल्गना महाविकास आघाडीतील नेत्यांनी केल्या. या वल्गना हवेतच विरल्या. मतदारांनी अक्षय कर्डिले यांच्या पारड्यात मते टाकली आणि महाविकास आघाडीला सपशेल नाकारले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ