मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. या व्हिडिओत झिरवळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आला होता.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झिरवळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकरणाबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितले की, दोन ते तीन वेगवेगळे व्हिडिओ एकत्र जोडून चुकीच्या पद्धतीने आणि दुष्प्रचाराच्या उद्देशाने हे क्लिप पसरवण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की, या व्हिडिओची सत्यता पडताळली जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाने स्पष्टपणे सांगितले की, नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. त्यांना पूर्ण अभय देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अनेक नेत्यांवर आरोप झालेले आहेत. यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांचा राजीनामा पक्षाने घेतला होता. तसेच राज्यमंत्री दर्जाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही नुकताच राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर झिरवळ यांच्याबाबतही राजीनाम्याची चर्चा रंगली होती. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत होते की, प्रत्येक आरोपावर लगेच राजीनामा घेणे योग्य नाही.
पक्षाची प्रतिमा मलीन होण्याची भीती व्यक्त करत पक्षातील चर्चेत असे मत पुढे आले की, रुपाली चाकणकर आणि नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला तर पक्षाविषयी लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. तसेच, मंत्री अडचणीत आले की पक्ष त्यांच्या बाजूने उभा राहत नाही, अशी धारणा पक्षातील नेत्यांमध्ये निर्माण होईल. त्यामुळे या प्रकरणाची तटस्थ आणि सखोल चौकशी झाल्यानंतरच योग्य कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा पक्षातील अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती.
सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नरहरी झिरवळ यांना अभय दिले असून, त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय नाकारला आहे. मात्र, व्हिडिओची सत्यता तपासण्याचे काम सुरू असल्याचे सूचित करण्यात आले आहे.










