माजी उपमहापौर गणेश भोसले यांची मागणी
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीमध्ये चालू आर्थिक वर्षात घरपट्टीचे रिव्हिजन खाजगी एजन्सीमार्फत करण्यात आले असून त्यानुसार मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या वाढीव घरपट्टीबाबत शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने हा विषय आगामी महासभेत चर्चेसाठी घ्यावा, अशी मागणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी महापौर ज्योतीताई गाडे यांना पत्राद्वारे केली आहे.
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, महानगरपालिका हद्दीतील अनेक भागांमध्ये घरपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून नगरसेवकांकडे येत आहेत. वाढीव घरपट्टीमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून या संदर्भात नागरिकांना स्पष्ट माहिती मिळत नसल्यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महासभेत वाढीव घरपट्टीचा विषय सविस्तर चर्चेसाठी घेण्यात यावा. तसेच घरपट्टी रिव्हिजनशी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच हे काम ज्या खाजगी एजन्सीमार्फत करण्यात आले आहे, त्या एजन्सीचा पूर्ण माहिती असलेला प्रतिनिधी महासभेत उपस्थित राहील याबाबत संबंधित विभागाला आदेश देण्यात यावेत, अशी विनंतीही त्यांनी पत्रातून केली आहे.
नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता या विषयावर महासभेत सविस्तर चर्चा होऊन योग्य निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.










