राजूर | नगर सह्याद्री
भंडारदरा परिसरात पावसाचे रौद्र रूप कायम असून धरण साठा 91 टक्के पर्यंत पोहोचला आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी स्पीलवे गेट मधून 10894 क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. प्रवरा नदी दुथडी भरून वाहू लागलेने रंधा धबधबा येथे पाण्याने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. निळवंडे धरण ही 56 टक्के भरले आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि परिसरात बुधवारी (22 जुलै) सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर काहींची घरे उद्ध्वस्त झाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने या भागातील दैनंदिन वाहतूक ठप्प झाली होती. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे आदिवासी भागातील नागरिकांचे मोठे आर्थिक व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने संसार उघड्यावर आले आहेत.

भंडारदरा गावचे माऊली खाडे यांच्या घराचे पत्रे वादळामुळे उडून गेल्याने घराची अशी पडझड झाली. वादळामुळे डोक्यावरचे हक्काचे छप्पर गमावलेल्या कुटुंबांना प्रशासनाकडून तात्पुरता निवारा आणि आपत्कालीन मदत उपलब्ध करून देण्यात आली. जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या घाटघर येथे 220 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर शेजारच्या रतनवाडी येथे 206 मीमी, पांजरे 203 मीमी, भंडारदरा 182 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. गरज असेल तर घराबाहेर पडण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. पाणी लेवल नियंत्रण ठेवण्यासाठी शाखा अभियंता सागर ढोकणेसह वसंत भालेराव सर्व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.










