
पाणलोटात पावसाची जोरदार मुसंडी / भात खाचरे ही भरले..
विलास तुपे / नगर सह्याद्री
अहमदनगर जिल्ह्याचे मिनि काश्मिर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने हाहाकार उडविला असल्यामुळे उत्तर नगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेले भंडारदरा धरण 54 टक्के भरले असल्याचे अहमदनगर पाटबंधारे विभागाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या सतत पडत असलेल्या पावसामुळे आदिवासी बांधवांची भात खाचरे तुडुंब भरली असुन भात लागवडी जोमाने सुरु होण्याच्या मार्गावर आहे. तर सलग चौथ्या दिवशी कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढच होत असुन बुधवारी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 5897 दलघफु झाला असुन हे ब्रिटीश कालीन धरण निम्मे भरले आहे.
कळसुबाई शिखराच्या परीसरातही पर्जन्यवृष्टी होत असुन कृष्णावंती नदीला पाणी वाहते झाल्याने या नदीवरील वाकी धरण ओसंडून वाहू लागलेने रंधा धबधबा ही कोसळू लागला आहे. हे धरण भरले म्हणजे निळवंडे धरणाकडे लवकरच पाणी झेपावणार असल्याचे दिसुन येत आहे. निळवंडे धरण साठा 2282 दशलक्ष घनफूट असून 27.38% झाला आहे .गत 12 तासात भंडारदरा येथे 83मिमी पावसाची नोंद झाली असुन पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या घाटघर येथे 259 मिमी, रतनवाडी 153 मिमी, पांजरे 123मिमी, तर वाकी येथे 89 मीमी पावसाची नोंद झाली. मागील २४ तासात धरणात 710दलघफू नविन पाण्याची आवक झाली आहे.

मांडवे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता / | संगमनेर-पारनेर तालुक्यांचा संपर्क तुटण्याचा धोका
पारनेर | नगर सह्याद्री
गेल्या दोन-तीन दिवसांपासून अकोले आणि संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (दि. 7) जोरदार बॅटिंग केली. या दमदार पावसामुळे मुळा नदीला यंदाच्या हंगामातील पहिला मोठा पूर आला आहे. नदी सध्या दुथडी भरून वाहत असून, पुराचे पाणी प्रचंड वेगाने मुळा धरणाच्या दिशेने सरकत आहे.
नदीपात्रातील पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्यामुळे संगमनेर आणि पारनेर तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मांडवे पूल पाण्याखाली जाण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे.
मांडवे पूल हा संगमनेर आणि पारनेर तालुक्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून रोज शेकडो वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, सध्या या पुलाखालून तब्बल 10 ते 12 फूट उंचीवरून पाण्याचा प्रवाह वाहत आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अत्यंत वेगाने वाढत असून, हा प्रवाह असाच सुरू राहिल्यास मांडवे पूल कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाऊ शकतो. पूर आल्यास संगमनेर-पारनेर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल आणि दोन्ही तालुक्यांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुळा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी मांडवे पुलावर प्रचंड गद केली आहे.पाण्याचा वेग आणि वाढती पातळी पाहता मोठा अनपेक्षित धोका निर्माण होऊ शकतो. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
काही काळ पुलावरून पाणी गेले
मंगळवारी रात्री मांडवे पुलावरून पाणी गेले असून सध्या पाण्याचा प्रवाह ओसरला असला, तरी धोका टळलेला नाही. हरिश्चंद्रगडावर सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीचा जलस्तर पुन्हा वेगाने वाढून पूल कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पुलावरून प्रवास टाळावा आणि नदीकाठच्या गावांनी पूर्णपणे सतर्क राहावे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
भाळवणीत जोरदार पावसाने बाजारकरूंची तारांबळ
भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी पावसाची संततधार सुरू असल्याने बाजारकरुंची तारांबळ उडाली. सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. परिसरातील काळकूप, माळकुप, जामगाव, वडगाव आमली, दैठणे गुंजाळ, भांडगाव सह अनेक गावात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून लांबलेल्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे.या पावसामुळे भाळवणीच्या आठवडे बाजारात व्यापारी व बाजारकरू यांची मात्र मोठी तारांबळ उडाली.
गोदावरी, भीमा, कुकडी नदीत विसर्ग सुरुच
जिल्ह्यात बुधवारी पावसाच्या दमदार सरी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून बुधवारी 1 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 18 हजार 403 क्युसेक, तर भीमा नदी पात्रात 85 हजार 784 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर येडगाव धरणाच्या सांडव्यावरुन कुकडी नदी पात्रात दोन हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच नदीपात्रातील साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.
आज सकाळी बंधाऱ्यातून 6 हजार 310 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन सकाळी 9 वाजता त्यामध्ये वाढ करून विसर्ग 12 हजार 620 क्युसेक्स करण्यात आला आहे. तर दुपारी बारा वाजता 15 हजार 248 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नदीपात्रालगतच्या परिसरातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, नदीपात्रात कोणतेही साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत. तसेच पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीच्या इशारा; अकोलेत शाळांना सुट्टी
अहिल्यानगर : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळांना बुधवार, दि. 8 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी आदेश दिले. भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दि. 8 जुलै रोजी अकोले तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटीसदृश परिस्थिती, पूरस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये आधीच अतिवृष्टी झालेली आहे. ही स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 25 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अकोले तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळांना दि. 8 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधीचे कामकाज करण्याच्या सुचना आहेत.










