मुख्य यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात
निघोज | नगर सह्याद्री-
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रा उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, मुख्य यात्रेला शुक्रवार दि.१० रोजी सुरुवात होत आहे.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, मळगंगा यात्रा उत्सव समिती, निघोज ग्रूप ग्रामपंचायत, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ एकत्रित येऊन या यात्रेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात. शुक्रवार दि. १० रोजी पहाटे महाअभिषेक पूजा व महाआरती त्यानंतर देवीदर्शनाला सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी पाच दिवसात किमान पाच लाखांपेक्षा जास्त भाविक येत असल्याचे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.पाच दिवस मळगंगा देवीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत सर्वांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी मळगंगा ट्रस्ट दर्शन व्यवस्था करीत असते.
शुक्रवारी दि.१० रोजी दुपारी ४ ते ६ बगाडगाडा मिरवणूक, सायंकाळी ६ ते ७ देवीला अंबील वर्तविणे, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन, सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत या महाप्रसादाचा तब्बल लाखभर भाविक लाभ घेत असतात. त्यानंतर रात्री ८ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत देवीच्या काठ्यांची व पालखीची मिरवणूक, गावोगावच्या पालख्या व काठ्या मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी होत असतात.
या मिरवणुकीच्या अग्रभागी गावोगावचे लेझीम पथक तसेच ढोल ताशा मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवीत असतात. या मिरवणुकीत किमान दोन लाख भाविक सहभागी होत असतात. मध्यरात्री उशिरा देवीच्या हेमांडपंथी बारवेत श्री चे घागर दर्शन होणार आहे. देवीच्या मानकर्यांच्या हस्ते या घागरीची पूजा अर्चा केली जाते. शनिवार दि.११ रोजी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत या घागरीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीसाठी व घागर दर्शन घेण्यासाठी राज्यातून किमान चार लाख भाविकांची उपस्थिती असते. त्यानंतर दुपारी चार वाजता छबिन्याची मिरवणूक कुंडावर जाते. त्यावेळी कुंडाची यात्रा सुरू होत असते. दोन दिवस ही यात्रा चालते. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, मळगंगा यात्रा उत्सव समिती, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांनी एकत्रित या यात्रेची तयारी केली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, पाण्याची व्यवस्था, एसटी बसेस, तसेच ग्रामअभियान, ग्रामस्वच्छता, आरोग्य आदी कामे मार्गी लागली आहेत.










