जामखेड | नगर सह्याद्री
माझ्यावर तलवार, चॉपर आणि लोखंडी रॉडने हल्ला झाला आहे, तातडीने मदत पाठवा, असा खोटा संदेश डायल ११२ वर देत पोलीस यंत्रणेची दिशाभूल करणार्या मद्यधुंद युवकाविरुद्ध खर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सागर श्रीधर ढोले (रा. कुटेवस्ती, वंजारवाडी, ता. जामखेड) असे आरोपीचे नाव आहे.
३ जून रोजी सायंकाळी ४.३७ वाजता डायल ११२ नियंत्रण कक्षाला सागर ढोले याचा फोन आला. काही अज्ञात व्यक्तींनी तलवार, चॉपर आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे सांगत त्याने तातडीच्या पोलीस मदतीची मागणी केली. गंभीर स्वरूपाचा कॉल प्राप्त झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी व होमगार्डचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले.
मात्र, वंजारवाडी येथे पोहोचल्यानंतर हल्ल्याचा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे समोर आले. सागर ढोले हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. तो असंबद्ध बोलत होता तसेच त्याच्या श्वासातून मद्याचा तीव्र वास येत होता. यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संपूर्ण प्रकार खोटा असल्याचे उघड झाले. त्याचे वडील श्रीधर ढोले व आई जयश्रीबाई ढोले यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सागर हा वारंवार मद्यपान करून कुटुंबीयांना त्रास देतो. पत्नी, मुले व आई-वडिलांना मारहाण करणे, घरातील वस्तूंची तोडफोड करणे तसेच पोलीस यंत्रणेला खोटे कॉल करून त्रास देणे, अशी त्याची सवय असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच मोबाईल बंद करून पसार होण्याचे प्रकारही तो वारंवार करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सरकारी दवाखाना खर्डा येथे करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत सागर ढोले याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाची दिशाभूल करणे, शासकीय मनुष्यबळ व संसाधनांचा अपव्यय करणे आणि सार्वजनिक यंत्रणेला विनाकारण कामाला लावणे, असा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रविण थोरात यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार गोकुळ इंगावले करीत आहेत.










