अहिल्यानगर | नगर सह्याद्री
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल टप्पा दोन मंजुरीसाठी लाच मागणार्या दोन अधिकार्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. ग्रामसेविका व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी मिळून १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले असून, सापळा रचून एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आले आहे.
या प्रकरणी तक्रारदाराच्या वडिलांनी सन २०२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला होता. २०२४ मध्ये यादीत नाव आल्यानंतर त्यांच्या खात्यात १५ हजार रुपये अनुदान जमा झाले. मात्र पुढील टप्पा मंजुरीसाठी ग्रामपंचायत कर्जुने खारे येथील ग्रामसेविका पुष्पा डेरे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली. तसेच पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गौतम सूर्यवंशी यांनीही घरकुल निधी मिळवून देण्यासाठी स्वतंत्र १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पडताळणी कारवाईत दोघांनी प्रत्येकी ५ हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदार पैसे देण्यासाठी ग्रामसेविका डेरे यांच्याकडे गेले असता त्यांनी रक्कम अभियंता सूर्यवंशी यांच्याकडे देण्यास सांगितले. निमगाव घाणा रोड, कर्जुने खारे येथे सूर्यवंशी यांनी १० हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपतच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.या कारवाईत पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यश मिळवले. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे करीत आहेत.










