एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने टळली भीषण दुर्घटना
जामखेड | नगर सह्याद्री
खर्डा-जामखेड मार्गावरील गोलेकर लवण येथे मंगळवारी दुपारी एसटी बस आणि कार यांच्यात होणारी भीषण दुर्घटना चालकाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात टळली. तुळजापूर-शिरूर मार्गावरील एसटी बससमोर अचानक होंडा कार आडवी आल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, चालक भाऊसाहेब पवार यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बसमधील अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.
तुळजापूर-शिरूर ही एसटी बस मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास गोलेकर लवण येथील पुलाजवळून जात होती. यावेळी सितारामगड परिसराकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याने आलेली होंडा कार मुख्य रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात थेट बससमोर आली. त्यामुळे क्षणार्धात अपघाताची परिस्थिती निर्माण झाली.
अचानक कार समोर आल्याचे लक्षात येताच चालक भाऊसाहेब पवार यांनी तत्काळ बसवरील नियंत्रण कायम ठेवत जोरदार ब्रेक लावले. त्याचवेळी बस उजव्या बाजूला वळवून कारला होणारी धडक टाळली. त्यामुळे बस रस्ताओलांडून पलीकडील बाजूस सुरक्षितपणे थांबली. चालकाच्या या समयसूचकतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
घटनेच्यावेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. अपघात टळल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनेकांनी चालक भाऊसाहेब पवार यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.अपघातास कारणीभूत ठरलेला कारचालक घटनास्थळावरून निघून गेला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. मात्र, काही क्षणांसाठी निर्माण झालेल्या या थरारक प्रसंगाची परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती.
बस चालकाच्या धाडसाचे कौतुक
एसटी चालक भाऊसाहेब पवार यांनी दाखविलेल्या धाडस आणि समयसूचकतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे प्रवासी तसेच नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.










