- जाहिरात -spot_img
breaking news

‌‘गाढवा‌’ने दिला दगा, आता ‌‘घोड्या‌’वर भिस्त!

जामखेड तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा | फक्त 16 दिवस पाऊस; 56.38 टक्के खरीप पेरणी पूर्ण
जामखेड | नगर सह्याद्री-
मृग नक्षत्रानंतर आर्द्रा नक्षत्रातील गाढवाने ही दगा दिल्याने जामखेड तालुक्यातील बळीराजा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. पावसाळ्याचा पहिला महिना संपला, तरी तालुक्यात अद्याप दमदार, सलग आणि सर्वदूर पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाची सुरुवातच अडचणीत आली आहे. आता पुनर्वसू नक्षत्रातील घोड्यावरच पावसाची भिस्त असून त्यानंतर पेरण्यांना वेग येणार आहे.

यंदा 8 ते 22 जूनदरम्यान मृग नक्षत्र, तर 22 जून ते 6 जुलैदरम्यान आर्द्रा नक्षत्र होते. ग्रामीण भागात या दोन्ही नक्षत्रांमध्ये चांगला पाऊस होण्याची अपेक्षा असते. मात्र यंदा दोन्ही नक्षत्रांनी अपेक्षाभंग केला. पावसाळ्याचे तब्बल 37 दिवस उलटूनही तालुक्यात केवळ 16 दिवस पावसाची नोंद झाली आहे. त्यातही अनेक दिवस किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला, तर काही भागात एकाच दिवशी जोरदार सरी कोसळल्या. परिणामी पावसाचे वितरण पूर्णपणे असमान राहिल्याने शेतात आवश्यक ओलावा निर्माण होऊ शकलेला नाही.

जामखेड तालुक्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामावर अवलंबून आहे. जून महिन्यात वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाला असता, तर बहुतांश क्षेत्रातील पेरण्या पूर्ण होऊन पिकांची उगवणही समाधानकारक झाली असती. मात्र पावसाने सुरुवातीपासूनच लहरीपणा दाखवल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक जोखमीचा सामना करावा लागत आहे. बियाणे, खते आणि मशागतीवर लाखो रुपयांचा खर्च करूनही पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी उगवण मंदावली असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.30 जून 2026 अखेर जामखेड तालुक्यात सरासरी 118.7 मिमी पावसाची नोंद झाली असून, ती अपेक्षित सरासरीच्या सुमारे 89 टक्के आहे. तर जुलै महिन्यात 7 जुलैपर्यंत 33.9 मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या केवळ 27.5 टक्के आहे. पावसाचा भरोसा नसतानाही पेरणीचा हंगाम हातातून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी धोका पत्करत पेरणी सुरू ठेवली आहे. कृषी विभागाच्या 7 जुलैपर्यंतच्या अहवालानुसार तालुक्यात 33 हजार 174 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली असून, हे एकूण क्षेत्राच्या 56.38 टक्के आहे. आठवडाभरात दमदार पाऊस झाला नाही, तर उगवण झालेल्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  सात्रळमध्ये व्यापार्‍याला अडवून मारहाण; जबरदस्तीने पैसे उकळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

जामखेड तालुक्यात आतापर्यंत 56.38 टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाचे प्रमाण काही प्रमाणात समाधानकारक असले, तरी त्याचे वितरण असमान राहिले आहे. त्यामुळे काही भागांत पिकांच्या उगवणीवर परिणाम दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत चांगला आणि सलग पाऊस झाल्यास उगवण सुधारेल व पिकांना मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांनी घाईघाईने कोणताही निर्णय न घेता कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पुढील उपाययोजना कराव्यात. परिस्थितीवर कृषी विभागाचे सातत्याने लक्ष असून, शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येत आहे.
– रविंद्र घुले,
तालुका कृषी अधिकारी, जामखेड

१ ते ७ जुलैदरम्यान मंडळनिहाय पावसाची नोंद (मिमी)
मंडळ. पाऊस
जामखेड. २८.६
अरणगाव. ४०.५
खर्डा. ४२.९
नान्नज. ३६.०
नायगाव. ३३.४
पाटोदा. २५.५
साकत. ३०.१
तालुक्याची सरासरी : ३३.९ मिमी

पिकनिहाय खरीप पेरणी (दि. ७ जुलै २०२६ पर्यंत)
पीक क्षेत्र (हेक्टर)
सोयाबीन. १६,७९१
उडीद. ७,५०५
तूर. ६,१७७
बाजरी. १,२४७
मूग. ५७२
मका. ८८२
एकूण पेरणी : ३३,१७४ हेक्टर (५६.३८ टक्के)

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ