अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने अहिल्यानगर येथील माळीवाडा वेशीला पुरातत्वीय आणि ऐतिहासिक महत्त्व तर आहेच शिवाय ती सांस्कृतिक वारसा पण आहे. त्यामुळे ती जतन करण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही वेस पाडू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठाने दिले आहेत.
विकासकामासाठी माळीवाडा वेस पाडण्याचे अहिल्यानगर महानगरपालिकेने ठरविले होते. या संदर्भात शहरातील काही जणांची महापालिकेच्या या धोरणाशी सहमती होती. तर काही जणांनी यास विरोध केला. ही वेस आपल्या शहराचा सांस्कृतिक वारसा असून ती ऐतिहासिक असल्याने ती पाडू नये असे विरोधकांचे म्हणणे होते. या संदर्भात अहिल्यानगरचे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते दत्ता कावरे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने पुरातत्व खात्याचा हवाला देत व ऐतिहासिक वारशाचे महत्त्व लक्षात घेऊन माळीवाडा वेशीचे संरक्षण करावे असे आदेश दिले. श्री. कावरे यांच्या वतीने ऍड. नारायण नरवडे, ऍड. माधव दुसुंगे व ऍड. कार्तिक कटारिया यांनी काम पाहिले.
दरम्यान खंडपीठाचा हा निर्णय येताच माळीवाडा वेस या ठिकाणी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विशसेना गटनेते दत्तात्रय कावरे, विक्रम राठोड, परेश लोखंडे, बहिरनाथ वाकळे, चंद्रकांत ताठे, शिवाजी जाधव, नितीन भुतारे, बाळासाहेब पुंड, अनिल चेडे, बाबासाहेब घोडके, विनायक इंगळे, फारूक शेख, पीयूष कोथिंबिरे, घनश्याम घोलप, संकेत तावरे, पंकज मेहेर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.










