- जाहिरात -spot_img
breaking news

जीवनदायी योजनेचा लाभ घ्या; आरोग्य हीच खरी संपत्ती – महापौर ज्योतीताई गाडे

 

जागतिक आरोग्य दिनानिमित्त मनपाचा स्तुत्य उपक्रम; मोफत दंत-मुख आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद / मोबाईलचा अतिवापर टाळा; आरोग्य रँकिंगमध्ये अव्वल येण्यासाठी प्रयत्न – आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत दंत-मुख आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महापौर ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. शहरातील नागरिक, आशा सेविका, विद्यार्थी व महापालिका कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महापौर ज्योतीताई गाडे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या माध्यमातून “जीवनदायी” योजनेअंतर्गत नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नगरकरांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आजच्या आधुनिक व धकाधकीच्या जीवनात नागरिक, विशेषतः महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन नियमित तपासणी करून निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. महापालिका आरोग्य विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात असून, या माध्यमातून आजारांचे वेळेवर निदान होऊन डॉक्टरांना योग्य उपचार करणे शक्य होते. त्यामुळे आरोग्य शिबिरे ही आजच्या काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी केमिकलयुक्त अन्न टाळून नैसर्गिक व संतुलित आहार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती दिपालीताई बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, उपायुक्त मेहेर लहारे, शहाजहान तडवी, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. आहाद शेख, डॉ. आलिया शेख यांच्यासह आशा सेविका, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित या शिबिरात आशा सेविका, विद्यार्थी व महापालिका कर्मचाऱ्यांची दंत-मुख तपासणी करण्यात आली. यामध्ये दात, हिरड्या, जिभेचे आजार, एक्स-रे, लॅब तपासणी तसेच हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दैनंदिन जीवनात दातांचे आरोग्य चांगले राखणे अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी नागरिकांनी नियमित काळजी घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राज्यातील आरोग्य रँकिंगमध्ये आघाडीवर येण्यासाठी मनपा आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :  शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन...; बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधान, भोंदू बागेश्वरवर बंदी घाला...

आयुक्त यशवंत डांगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सध्याच्या काळात केवळ वातावरणातील प्रदूषणच नव्हे तर विचारांचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नागरिकांनी मोबाईलचा मर्यादित वापर करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात २५ ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, डॉक्टर, कर्मचारी व आशा सेविकांनी नागरिकांमध्ये आजारांविषयी असलेले गैरसमज दूर करून विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये दररोज १०० ते १५० रुग्णांची तपासणी होणे अपेक्षित असून, जे डॉक्टर कामात कसूर करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महिला व बालकल्याण समिती सभापती दिपालीताई बारस्कर म्हणाल्या की, महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक या शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या आजारांचे वेळेवर निदान करून उपचार घेऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ