नऊ आरोपी ताब्यात; तीन लाख 15 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
शेवगाव | नगर सह्याद्री
तालुक्यातील जुने दहिफळ गावात अवैधरित्या चालणाऱ्या तिरट जुगाराच्या अड्ड्यावर शेवगाव पोलिसांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 9 आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून तीन मोटरसायकली, 6 मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण 3 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुने दहिफळ गावातील लोखंडे किराणा दुकानाच्या शेजारी ताडपत्री लावलेल्या जागेत काही जण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने तपास पथक पाचारण केले. पंच सोबत घेऊन पोलिसांनी खासगी वाहनाने जाऊन छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना आरोपी मिळून आले.
पोलिसांनी शफीक युसूफ शेख (वय 32, रा. जुने दहिफळ), उत्तम दगडु दिवटे (वय 65, रा. जुने दहिफळ), बाबासाहेब पाराजी मगर (वय 30, रा. जुने दहिफळ), रामदास आबासाहेब शिंदे (वय 32, रा. जुने दहिफळ), रामचंद्र मनोहर कुळभाऊ (वय 35, रा. मुंगी, ता. शेवगाव), शेषराव नानासाहेब गायकवाड (वय 42, रा. राक्षी, ता. शेवगाव), युनूस रूस्तुम शेख (वय 54, रा. जुने दहिफळ), बाळु उत्तम परदेशी (वय 49, रा. जुने दहिफळ), सुन्नीभाऊ सुमान शेख (वय 48, रा. जुने दहिफळ) या नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन मोटारसायकली, 6 मोबाईल, 5 हजार 500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3 लाख 15 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये नऊही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, हवालदार निलेश म्हस्के, नितीन भताने, शाम गुंजाळ, भगवान सानप, राहुल आठरे, ईश्वर बेरड, राजु बडे, वसंत वैद्य, एकनाथ बुधवंत, सूरज भावले, संपत खेडकर, प्रशांत आंधळे तसेच होमगार्ड तुषार बडे व राजेंद्र पोटभरे यांच्या पथकाने केली. पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन भताने पुढील तपास करत आहेत.










