महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायद्यांची गरज / डॉ. जयश्री थोरात | अॅसिड हल्ल्यातील चिमुकलीच्या न्यायासाठी तळेगाव फाटा येथे रास्ता रोको
संगमनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील वडगाव पान येथील तेरा वर्षाच्या शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या भ्याड अॅसिड हल्ल्याच्या निषेधार्थ लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय नागरिक व परिसरातील महिला, विद्यार्थिनी युवक यांनी एकत्र येऊन हल्ल्याचा तीव्र निषेध करत रास्ता रोको आंदोलन केले. त्याचबरोबर संगमनेर तालुयात चालले काय? असा सवाल करताना आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करताना महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कडक कायदे करावे, अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.
वडगाव पान येथील तळेगाव फाटा येथे सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात, नगराध्यक्षा डॉ.मैथिलीताई तांबे, दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, मा.उपसभापती बाळासाहेब गायकवाड, पद्माताई थोरात, विक्रम ओहोळ, नीलेश थोरात, शरद नाना थोरात, अर्जुन काशीद, सरपंच श्रीनाथ थोरात, रूपाली थोरात, अरुण कुळधरण, अहिल्या ओहोळ, सविता ओहोळ, बाळासाहेब गडगे, गणेश गडगे, रवींद्र मैड, सुधीर थोरात,आबासाहेब थोरात, भाग्यश्री शिरसाट, आनंद वर्पे, रावसाहेब जंबुकर यांच्यासह संगमनेर तालुयातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व वडगाव पानमधील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडगाव पान येथील चिमुकलीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी एकत्र येऊन तळेगाव फाटा येथे भव्य आंदोलन केले. यावेळी आरोपीला तातडीने अटक करा, ईश्वरीला न्याय द्या, अशा घोषणा देण्यात आला. तीनही बाजूने वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात बोलताना डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, लहानग्या चिमुकलीवर झालेला अॅसिड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपीला प्रशासनाने तातडीने शोधून कठोर शिक्षा केली पाहिजे. जेणेकरून पुढचा आरोपी असे गुन्हा करणार नाही. परवाच पठार भागातील एका युवतीवर चाकूने हल्ला झाला. काल अॅसिड हल्ला झाला, संगमनेर तालुयात चालले काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
प्रत्येक शाळेत मुली गुणवत्तेने पुढे आहेत. प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे जात आहे. अशा वेळेस अशा प्रकारचे विकृत मनोवृत्तीचे दर्शन करून महिलांची मानसिकता खराब करण्याचे काम काही समाजकंटक करत आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. येथे महिलांचा सन्मान झाला पाहिजे. संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. अशी परिस्थिती येथे कधीही नव्हती. अशा घटना घडतात कसे, असा सवाल करताना आरोपीला तातडीने पकडून कठोर शिक्षा झाली पाहिजे. याचबरोबर सरकारने महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे केले पाहिजे. घटना झाल्यानंतर आपण तातडीने प्रवरा हॉस्पिटल येथे जाऊन मुलीची चौकशी केली. तिचा चेहरा आणि डोळा खराब झाला आहे.
त्या लहान मुलीला बोलता सुद्धा येत नाही अशी वाईट अवस्था झाली आहे. काय दोष होता त्या मुलीचा समाज म्हणून राजकारण, पक्ष, जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून सर्वांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढे आले पाहिजे. विविध महाविद्यालय, शाळा यांच्या परिसरात, प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे सुरू केले पाहिजे. याचबरोबर महत्त्वाच्या गावांमध्ये पोलिसांची गस्तही सुरू केली पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी केली.तर डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर शहरामध्ये महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी रक्षक दल निर्माण केले आहे. त्याच पद्धतीने आपल्याला ग्रामीण भागामध्ये सुद्धा गावांमध्ये महिलांच्या सुरक्षेतेसाठी रक्षक दल निर्माण करावी लागतील. यावेळी अर्जुन काशीद, श्रीनाथ थोरात, नीलम खताळ, रूपाली थोरात, पद्मा थोरात यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी निवेदन स्वीकारले. आरोपीचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासन काम करत असल्याचे ते म्हणाले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
उपचाराचा सर्व खर्च एसएमबीटी संस्था करणार
१३ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मा. आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह विविध मान्यवरांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याचबरोबर घटना घडल्यानंतर डॉ.जयश्री थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी प्रवरा हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलीची चौकशी केली. याचबरोबर नातेवाईकांना धीर दिला. या मुलीच्या दवाखान्याचा उपचाराचा सर्व खर्च एसएमबीटी संस्था करणार असून, अत्याधुनिक टेनॉलॉजीद्वारे सर्जरी किंवा डोळ्याच्या आरोग्याबाबत डॉ.जयश्रीताई थोरात यांनी मुंबई येथील प्रतीथयश डॉ. रानडे विविध डॉटरांशी संपर्क केला आहे. या भ्याड हल्ल्याचा संगमनेर तालुयातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.










