शेवगाव | नगर सह्याद्री
पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका अट्टल आरोपीला शेवगाव पोलिसांनी अत्यंत शिताफीने गजाआड केले आहे.
रोहिदास बप्पासाहेब पारे (वय 27, रा. पाथरवाला बु. ता. गेवराई, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हा फिर्यादीला 30 लाख रुपये घेऊन त्याचे 60 लाख रुपये करून देतो, असे सांगून बनावट नोटा छापून देण्याचे आमिष दाखवत असे. पीडित व्यक्ती मोठी रक्कम घेऊन आल्यानंतर, नोटा छापताना काहीतरी तांत्रिक गोंधळ झाल्याचे नाटक करून तो मुख्य रक्कम घेऊन पळून जात असे. या भूलथापांना बळी पडल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने पोलिसात धाव घेतली होती.
गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला मुख्य आरोपी प्रशांत उर्फ राम मधुकर बोठे (रा. वाळकी, ता. नगर, जि. अहिल्यानगर) हा अहिल्यानगर शहरातून दौंड रोडने जाणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने दौंड रोड परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने आपल्या चारचाकी वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला अडवून ताब्यात घेतले आणि 5 जून रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. या अटकेमुळे अशाच प्रकारच्या अनेक फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.










