११ घरांची पडझड, तीन गाई दगावल्या, फक्राबादमध्ये महिला जखमी; वीजखांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित
जामखेड | नगर सह्याद्री
तालुक्यात शुक्रवारी दुपारी अचानक बदललेल्या हवामानाने अक्षरशः धुमाकूळ घातला. अवघ्या काही मिनिटांत आकाशात काळे ढग दाटून आले आणि त्यानंतर गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला. फक्राबाद, बावी, जवळा, धानोरा, डिसलेवाडी, वंजारवाडी, कुसडगाव, खांडवी, रत्नापूर, धामणगाव, मतेवाडी व बोर्ले परिसरात वादळाने मोठे नुकसान घडवून आणले. या नैसर्गिक आपत्तीत ११ घरांची पडझड झाली असून, गोठे जमीनदोस्त झाले आहेत. फक्राबादमध्ये महिला जखमी झाली असून, बावी येथे विजेच्या धक्क्याने तीन गाई दगावल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
दुपारी तीनच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन वार्याचा वेग वाढला. काही वेळातच जोरदार पावसासह गारपीट सुरू झाली. वादळी वार्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक घरांवरील पत्रे हवेत उडून गेली, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून शेतीपिके आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

फक्राबाद गावाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. गावातील पाच घरांची आणि दोन जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य भिजून खराब झाले. या घटनेत एका महिलेला दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जवळा गावातही वादळाने कहर केला. येथे तीन घरांची पडझड, दोन गोठे जमीनदोस्त झाले असून एक झोपडी पूर्णपणे कोसळली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.
खांडवी, रत्नापूर आणि धामणगाव या गावांमध्ये प्रत्येकी एका घराची पडझड झाली. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांना रात्रभर चिंता सतावत होती. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
बावी गावात गारपिटीसह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. शेतकरी पवन जाधव यांच्या शेतातील तीन गाई विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यूमुखी पडल्या. या घटनेमुळे जाधव कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय आंबा, चिंच आणि निंबोणीच्या फळबागांवर गारपिटीचा मोठा फटका बसला. अनेक झाडांची फळे गळून पडली, तर काही झाडे मुळासकट उन्मळून पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वीजखांब कोसळले; अनेक गावांत अंधार
वादळी वार्यामुळे काही भागांतील वीजखांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अनेक गावांमध्ये काही तास अंधाराचे साम्राज्य पसरले होते. महावितरणच्या कर्मचार्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.
पंचनामे करून मदतीची मागणी
खरीप हंगामाच्या तोंडावर आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. घरांचे, गोठ्यांचे, जनावरांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकर्यांनी केली आहे.










