- जाहिरात -spot_img
breaking news

विधान परिषदेची अहिल्यानगरची जागा कोणाला? बैठकांमधून नवा ट्विस्ट समोर

स्थानिक स्वराज संस्था निवडणूक | राष्ट्रवादी की भाजप; उमेदवारीसाठी भेटीगाठी, चर्चेचे गुर्‍हाळे सुरूच
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत भर पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यात नगरसह राज्यातील १६ जागांवर निवडणूक होणार. दरम्यान, विधान परिषदेची अहिल्यानगरची जागा कोणाला? महायुतीमधील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार की ऐनवळी भाजप ही जागा पटकवणार याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास या ठिकाणी स्थानिक नेत्यांची भूमिका महत्वाची ठरलेली आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील महत्त्वपूर्ण राहणार असून महायुतील घटक पक्ष असणार्‍या भाजप आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या भूमिकेवर या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत दिसत आहेत.

गेल्या दोन ते चार वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक रखडली होती. मात्र, नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेसाठी राज्यातील १६ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यात अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली, अमरावती, धाराशिव- लातूर- बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.

नगरच्या जागेबाबत अनेक चर्चा आणि तर्क असतांना राज्यातील अन्य मतदारसंघातील जागा ठरल्यानंतर नगरच्या जागेबाबत निर्णय होणार आहे. महायुतीमधील पवार गट ही जागा राखणार की या ठिकाणी भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार याबाबत खल सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नेते विधान परिषद निवडणुकीबाबत गुळणी धरून असून २३ तारखेला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौर्‍यानंतर खर्‍या अर्थाने या निवडणुकीच्या चर्चेची कोंडी फुटणार असल्याचे सांगण्यात आले.
माजी जि.प.सदस्य सचिन जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार राहुल जगताप, माजी महापौर संदीप कोतकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

हे सुद्धा वाचा :  गुन्हेगारांशी संबंध; पोलीस हवालदार शंकर चौधरी निलंबित

अरुणकाकांची दोनदा वर्णी
दरम्यान या पूर्वी नगरमधून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून स्व. अरुणकाका जगताप यांनी दोनदा बाजी मारली होती. विधानसभेला अपयश आल्याने त्यांनी विधानपरिषदेकडे मोर्चा वळविला. त्यात ते यशस्वी झाले. दोन वेळा ते विधानपरिषदेवर गेले. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची वर्णी लागली. ती ‘अभंग’ राष्ट्रवादी होती. आता अरुणकाकांचे सुपुत्र आमदार संग्राम जगताप हे ‘दुभंग’लेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत. पण आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षाशी जवळीक असल्याचे वेळोवेळी त्यांच्या कार्यशैलीतून दाखवून दिले आहे. जिल्ह्यात भाजपचे मतदार सर्वात जास्त आहेत आणि सध्या पालकमंत्री रााधाकृष्ण विखे पाटील यांचे भाजपवर वर्चस्व आहे. तेव्हा मूळचा भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता की विखेंचा माणूस की संग्राम जगताप यांचा माणूस असा त्रिकोण तयार झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विखे पाटील हे सामंजस्याने निर्णायक भूमिका घेतील असे मानले जात आहे.

भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ
जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका व नगर पंचायतींमध्ये महायुतीचे वर्चस्व आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण ४६१ मतदारांमध्ये सर्वाधिक १९९ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ५०, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ३५, शिवसेना शिंदे गटाचे ४८, काँग्रेसचे २९ तर इतर पक्ष व अपक्ष असे १०० नगसेवक आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ