साडेपाच वर्षांच्या काव्याचा उत्साह ठरला आकर्षण
पारनेर | नगर सह्याद्री
संत परंपरेचा वारसा जपत निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या राळेगणसिद्धी येथील युवकांच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष उत्साहात पार पडले. श्रीक्षेत्र पिंपळनेर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा तब्बल 230 किलोमीटरचा पायी प्रवास पाच दिवसांत पूर्ण करत सुमारे 22 वारकरी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले. या वारीत अवघ्या साडेपाच वर्षांच्या काव्या बाळासाहेब पठारे हिने केलेला उत्स्फूर्त सहभाग सर्वांसाठी विशेष आकर्षण आणि प्रेरणेचा विषय ठरला.
राळेगणसिद्धीतील तरुणांनी सुरू केलेल्या आरोग्यवारीचा उद्देश संत परंपरेसोबतच नियमित व्यायाम, चालण्याची सवय आणि निरोगी जीवनशैली, पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा होता. यंदा या उपक्रमाच्या चौथ्या वर्षात गावातील सुमारे 22 युवक सहभागी झाले होते. यामध्ये किरण आवारी, जयसिंग मापारी, हनुमान पठारे, अमोल मापारी, सुनिल हजारे, अनिल आनंदा गावडे, अमोल पानकुरे, अनिल तुकाराम गावडे, सुरेश पठारे, बाळू पठारे, सुदाम पठारे, विठ्ठल गाजरे, कुंडलिक भगत, अजय पडवळ, सुभाष गाजरे, शुभम मापारी, संतोष पठारे, संतोष साठे, ज्ञानेश्वर मापारी, सुनिल मापारी, पंकज तिकोणे आणि एकनाथ भालेकर यांनी वारी यशस्वी केली.
यंदाच्या वारीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते काव्या बाळू पठारे हिने अवघ्या साडेपाच वर्षांची असतानाही ती पहिल्या दिवसापासून आपल्या वडिलांसोबत नियमित चालत राहिली. तिचा उत्साह, जिद्द आणि सातत्य पाहून सर्वजण भारावून गेले. लहान वयातच संस्कार, शिस्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व तिने आपल्या कृतीतून दाखवून दिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.वारीदरम्यान ऊन, पाऊस, वारा आणि थकवा यांचा सामना करत प्रत्येकजण विठ्ठल नामाचा गजर करत पुढे सरकत होता. चालण्यामुळे शरीर थकत असले तरी विठ्ठल भेटीची ओढ आणि सहप्रवाशांचा आधार यामुळे प्रत्येक पाऊल अधिक उत्साहाने पडत होते. पाच दिवसांचा प्रवास पूर्ण करून वारकरी चंद्रभागेत स्नान करत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचले. दर्शनानंतर संपूर्ण प्रवासातील कष्ट सार्थकी लागल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. वारीदरम्यान राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकऱ्यांचे मनोबल उंचावले.
स्वतःचाच विक्रम मोडला
आरोग्यवारीच्या चौथ्या दिवशी ज्ञानेश्वर मापारी, सुनिल मापारी, पंकज तिकोणे आणि एकनाथ भालेकर यांनी तब्बल 70 किलोमीटरचे अंतर पायी पूर्ण करत मागील वषचा स्वतःचाच विक्रम मोडला. या चौघांच्या जिद्द, चिकाटी आणि शारीरिक क्षमतेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. यापूव ज्ञानेश्वर मापारी आणि सुनिल मापारी यांनी राळेगणसिद्धी-पंढरपूर-राळेगणसिद्धी ही सायकलवारी अवघ्या 48 तासांत पूर्ण करून निरोगी जीवनशैलीचा प्रभावी संदेश दिला होता. आरोग्य, शिस्त आणि सातत्य यांची जोड देणारे त्यांचे हे कार्य अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आरोग्य, संस्कार आणि संत परंपरेचा संदेश
राळेगणसिद्धीच्या तरुणांनी आरोग्य, शिस्त आणि संत परंपरा यांचा सुंदर संगम घडवत सलग चौथ्या वष आरोग्यवारी यशस्वीपणे पूर्ण केली, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आजच्या तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून अशा सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होणे ही काळाची गरज आहे. अवघ्या साडेपाच वर्षांच्या काव्याचा सहभागही प्रेरणादायी आहे. या उपक्रमातून समाजात आरोग्य, संस्कार आणि संत परंपरेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा मला विश्वास आहे.
-पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे










