- जाहिरात -spot_img
breaking news

पोलीस ठाण्यातच दोन गटात राडा, मावा कारखान्यावर छापा, आयटी कंपनीत चोरीचा प्रयत्न…

पोलिसांसमोरच एकमेकांना बेदम मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

स्थानिक कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन इसमांनी गोंधळ घालत एकमेकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ रघुनाथ हंडाळ यांनी स्वतः सरकारतर्फे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गणेश संजय भंडारी आणि मयूर चंद्रकांत कांडेकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात अक्षय चंद्रकांत कांडेकर हा जखमी तरुण तक्रार देण्यासाठी आला होता. पोलीस कर्मचारी त्याला उपचारासाठी दवाखाना मेमो देत असतानाच, तिथे अचानक आरोपी गणेश भंडारी आणि मयूर कांडेकर हे दोघे आले. त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेथे हजर असलेल्या पोलीस अंमलदारांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघांनी पोलिसांचे काहीही न ऐकता एकमेकांवर हल्ला केला.
पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांसह रात्रीचे गस्ती अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी तात्काळ धाव घेऊन दोघांची सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या दोघांनी पोलिसांशीच हुज्जत घातली आणि पोलिसांसमक्षच एकमेकांना बेदम मारहाण केली. पोलीस ठाण्यात अशा प्रकारे कायदा हातात घेऊन गोंधळ घातल्यामुळे अखेर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मावा कारखान्यावर छापा
अहिल्यानगर:तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखूयुक्त मावा तयार करणार्‍या एका अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी छापा टाकला. तपोवन रोड परिसरातील सूर्यनगर एसटी कॉलनी येथे राहत्या घरात हा अवैध व्यवसाय सुरू होता. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ५६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. राहुल नवनाथ गिते हा आपल्या घरात मशीनच्या साहाय्याने बेकायदेशीर मावा तयार करून विकत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क न झाल्याने, आरोपी पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन तातडीने कारवाई केली. पोलिसांनी सकाळी सव्वाआठ वाजता घरात छापा टाकला असता, आरोपी राहुल गिते हा मशीनवर मावा तयार करताना रंगेहाथ सापडला. त्याच्या घरातून ५ किलो तयार मावा, ३ किलो सुगंधी तंबाखू, ५ किलो कच्ची सुपारी आणि मावा कातरण्याच्या दोन मोठ्या मशीन जप्त करण्यात आल्या. हा माल त्याने मुकुंदनगर येथील कय्युम आयुब शेख याच्याकडून आणल्याचे कबूल केले. याप्रकरणी पोलिसांनी राहुल नवनाथ गिते आणि माल पुरवणारा आरोपी कय्युम आयुब शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा :  बदलत्या पावसाच्या पॅटर्नने बळीराजाची धाकधूक वाढली!; खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट

आयटी कंपनीत चोरीचा प्रयत्न
अहिल्यानगर: पाईपलाईन रोडवरील वाणी नगर भागात एका नामांकित आयटी कंपनीचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्याला नागरिकांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले. ही घटना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. वाणी हाईट्स इमारतीच्या पाचव्या मजल्यावर अभिषेक भाऊसाहेब शिंदे यांची मड्रगकोड सोल्यूशन्सफ नावाची आयटी कंपनी आणि प्रशिक्षण संस्था आहे. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने कार्यालय बंद होते. मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाच्या आवारात राहणार्‍या एका मित्राला दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्याने तातडीने भागीदार आणि इतर नागरिकांना बोलावून घेतले. जाग आल्याचे समजताच चोरट्याने कार्यालयातील टीव्ही, खुर्च्या आणि इतर साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्याने थेट पाचव्या मजल्याच्या गॅलरीतून खाली असलेल्या पत्र्याच्या शेडवर उडी मारली. या उडीमुळे चोरटा गंभीर जखमी झाला. जवळच असलेल्या एका बंद शाळेच्या खोलीत चोरटा लपून बसलेला आढळला. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कृष्णा आल्हाट असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ