बांधकाम विभागाकडून भूसंपादनानंतरच काम सुरू होणार असल्याचे लेखी उत्तर
नारायणगव्हाण | नगर सह्याद्री
नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या चौपदरीकरणाच्या प्रश्नावर सुपा पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग व ग्रामस्थ यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांनी 16 जुलै रोजी जाहीर केलेले आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
रक्तरंजित ठरत असलेल्या या महामार्गावर सातत्याने अपघात होत असून, अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. विद्याथ, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सचिन बबन शेळके यांनी ग्रामस्थांच्यावतीने प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (प्रांत), सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार पारनेर आणि सुपा पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आंदोलनकर्ते, ग्रामस्थ आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सकाळी 11 वाजता बोलावली. बैठकीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नारायणगव्हाणकरांचे जीवन धोक्यात आले आहे. आता रस्त्याच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होणार नाही. दररोज अपघात होत असताना प्रशासनाने केवळ आश्वासनांवर वेळ घालवू नये, तर चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने 10 जुलै रोजी सचिन शेळके यांना दिलेल्या लेखी पत्रात चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू करता येईल, असे उपविभागीय अधिकारी एस. एस. लाड यांनी बैठकी दरम्यान सांगितले. शाखा अभियंता सुजाता तुपे, गोकूळ घोडके यांनी अपघात टाळण्यासाठी दिशादर्शक फलक, रोड मार्किंग, रिफ्लेक्टर, दुभाजक रंगविणे आणि सौर दिवे बसविणे यासारख्या तात्पुरत्या सुरक्षा उपाययोजना करण्यात येतील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच यापूव जाहीर केलेले आंदोलन मागे घेण्याची विनंतीही विभागाने केली होती.मात्र, ग्रामस्थांनी या उत्तरावर समाधान व्यक्त न करता भूसंपादनाचे कारण पुढे करून वर्षानुवर्षे काम रखडले आहे. आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्णय घेतला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक ज्याती गडकरी यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास चिंचकर यांना फोन लावला असता दोन दिवसांपूव मला गावच्या सीमाकनांचा नकाशा प्राप्त झाल्याचे सांगितले. तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले परंतु काम सुरू करा, अन्यथा आंदोलन होणार असा पवित्रा सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांच्यासह ग्रामस्थांनी घेतला आहे.
ठरल्याप्रमाणे 16 जुलै रोजी आंदोलन होणार
यापूव जाहीर केल्याप्रमाणे 16 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नारायणगव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोरून प्रशासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा, सकाळी 9 वा नगर-पुणे महामार्गावर पुतळा दहन व रास्ता रोको आंदोलन ठरल्याप्रमाणे वेळेत होणार असल्याचे आंदोलनकर्ते सचिन शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.










