- जाहिरात -spot_img
breaking news

एल निनोचा धोका, प्रशासन अलर्ट मोडवर; पाणी, चारा, रोजगारासाठी जिल्हा सज्ज!

जिल्ह्यातील धरणे, जलसाठ्यांचे सप्टेंबरपर्यंत सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील*
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
एल निनोच्या प्रभावामुळे पावसास उशीर झाल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या धरणांमधील तसेच मध्यम व लघु प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे सप्टेंबरपर्यंत सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एल निनोच्या पार्श्वभूमीवरील पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते.
यावेळी आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, गावे, वाड्या-वस्त्यांच्या गरजेनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी टँकरमधील पाणी थेट विहिरीत न टाकता तोटीयुक्त प्लास्टिकच्या टाक्यांमधून नागरिकांना वितरित करावे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळून सर्व नागरिकांना समान आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल.

ते पुढे म्हणाले की, टँकरमध्ये भरण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने नियमितपणे तपासण्यात यावेत. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळेल याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा स्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा नियमित आढावा घ्यावा. गावनिहाय टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून त्यानुसारच वितरण करण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणांहून टँकरसाठी पाणी भरले जाते, तेथील वीजपुरवठा अखंडित राहील याची महावितरण कंपनीने काळजी घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्यातील पशुधनाला चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे चारा उपलब्धतेचा आढावा घ्यावा. गावनिहाय आणि तालुकानिहाय चाऱ्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर जाणार नाही, याची दक्षता घेत पशुपालकांना वेळेवर मदत मिळेल यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

हे सुद्धा वाचा :  मुळा नदीवरील पुलावरून प्रवास जीवघेणा...नेमके कारण काय

ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर करावीत. संभाव्य दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी नियोजनबद्ध रोजगारनिर्मितीवर भर द्यावा. तसेच पाणी जपून वापरण्याबाबत ग्रामीण आणि शहरी भागात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरणांमधील पाणीसाठा, टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा, चारा टंचाई उपाययोजना आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ