सासरच्या छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
जामखेड | नगर सह्याद्री
तालुयातील खर्डा येथे सासरच्या मंडळींकडून होणार्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐश्वर्या लखन शिंदे असे मृत विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी पतीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सूरज बाळू इंगळे (वय २४, रा. शिवशंकरनगर, भूम) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पती लखन चंद्रकांत शिंदे, सासू उषा चंद्रकांत शिंदे, दीर राहुल चंद्रकांत शिंदे आणि नणंद रोहिणी त्र्यंबके शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
ऐश्वर्या हिचे लग्न झाल्यापासून आरोपींकडून तिला वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. हुंडा न दिल्याबद्दल, सोन्याचे दागिने न आणल्याबद्दल तसेच घरकाम नीट येत नसल्याच्या कारणावरून तिचा वारंवार अपमान केला जात होता. तुझी बहीण घेऊन जा, मी तिला नांदवणार नाही. तिला दोन मुली झाल्या आहेत, असे म्हणत तिला भिकार्याची मुलगी म्हणून हिणवले जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय चारचाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रुपयांची मागणीही करण्यात येत होती, असा आरोप आहे.
दरम्यान, दिनांक ३ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ, खर्डा येथे ही घटना घडली. त्याआधी पहाटे सुमारे ४ वाजता पती लखन शिंदे हा दारूच्या नशेत घरी आला. ऐश्वर्याला पाय, मांडी, हात, पाठ, कंबर, कपाळ व ओठावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या छळ व मारहाणीला कंटाळून ऐश्वर्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती लखन चंद्रकांत शिंदे, सासू उषा चंद्रकांत शिंदे व दीर राहुल चंद्रकांत शिंदे यांना अटक केली.










