अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
नगर तालुक्यातील कामरगाव येथे ग्रामदैवत कामाक्षा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप फोडून सोने चांदीचे दागिने आणि पितळी मुकुट लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर नेहमीप्रमाणे 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता बंद करण्यात आले होते. मात्र 17 जुलै रोजी पहाटे सुमारे 3.45 वाजता सीसीटीव्ही फुटेज पाहताना मंदिराचे पुजारी दिनेश खाडे यांच्या पत्नी मंगल खाडे यांच्या निदर्शनास चोरीची घटना आली. त्यानंतर पुजारी, मंदिर समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावले.पाहणी केली असता, मुख्य गाभाऱ्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे आढळून आले.
चोरट्यांनी देवीच्या अंगावरील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची मण्यांची पोत, 4 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पळ्या आणि दोन पितळी मुकुट असा एकूण सुमारे 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच डायल 112 वर संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.ग्रामदैवताच्या मंदिरातच चोरी झाल्याने कामरगावसह परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरट्यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास पोसई इंगळे करीत आहेत.












