अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
नगर-कल्याण रोड परिसरातील जाधव मळा भागात एका अज्ञात इसमाने झोपेत असलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात त्याची पत्नी देखील गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मण उर्फ लक्ष्या मार्तंड काळे (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना १६ जून रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडली.
याबाबत रूपाली लक्ष्मण काळे (वय २८, रा. मु.पो. काळेगाव, ता. शेवगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे पती लक्ष्मण उर्फ लक्ष्या मार्तंड काळे (वय ३०) हे नगर-कल्याण रोडवरील जाधव मळा येथील एका शेडमध्ये वास्तव्यास होते. अज्ञात इसमाने झोपेत असलेल्या लक्ष्मण काळे यांच्या तोंडावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. एवढेच नव्हे तर, हल्लेखोराने फिर्यादी रूपाली काळे यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला.
या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक लॅब आणि फिंगरप्रिंट स्कॉडला पाचारण करण्यात आले असून, तपासाला गती देण्यात आली आहे. लक्ष्मण काळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) आणि १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर कोण होता आणि त्याने हे कृत्य कोणत्या कारणासाठी केले, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. पो.नि. नितीन देशमुख हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.










