नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
उद्धव ठाकरे यांचा पक्ष दुसऱ्यांदा फुटल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. खासदारांच्या फुटीवर पक्षाकडून व्हीप जारी करून दिल्लीत बैठक बोलवण्यात आली होती. पण या बैठकीला त्या सहा फुटीर खासदारांनी दांडी मारली. २०२२ च्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाला पुन्हा एकदा लोकसभा खासदारांच्या पातळीवर मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. या ६ फुटीर खासदारांना आता कायदेशीर नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरेंच्या सल्ल्यानंतर दिल्लीमध्ये बोलावलेल्या महत्त्वाच्या संसदीय बैठकीला लोकसभेच्या ९ खासदारांपैकी केवळ ३ खासदार उपस्थित राहिले, तर ६ खासदार गैरहजर राहिले. लोकसभेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हेच केवळ बैठकीत दाखल झाले होते.
ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर हे ६ खासदार बैठकीला पोहोचले नाहीत आणि त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. हे ६ खासदारांनी व्हिप धुडकावल्याचे बोलले जात आहे. या खासदारांवर हक्कभंगाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
खासदारकी रद्द करण्याची मागणी –
दिल्लीतील या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हिप जारी करून उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. व्हिपचा निरोप ईमेल, व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे प्रत्येकापर्यंत पोहोचवला गेला होता. व्हिप जारी करूनही गैरहजर राहिल्यामुळे या खासदारांवर पक्षशिस्त भंगाची कारवाई होऊ शकते. तसेच शेड्युल १० (१० वे वेळापत्रक – पक्षांतर बंदी कायदा) नुसार त्यांची खासदारकी रद्द करण्याची कायदेशीर मागणी केली जाऊ शकते.
इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाही : संजय राऊत
राज्यभरात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार असल्याचे म्हंटले जात आहे. संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्विट करत म्हटले आहे की, “आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितले होते, पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते! बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, सध्याचे राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते! त्या अधिक प्रामाणिक असतात. (महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपीठा बनवला आहे, इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाही) जय महाराष्ट्र.”
आता मोकळीक द्यायची नाही, धडा शिकवायचा; शरद पवारांचा संजय राऊतांना फोन
ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) चांगलाच आक्रमक झाला आहे. नवी दिल्लीत आज पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचा व्हीप जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ तीनच खासदार बैठकीला आले असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीपूर्वी खासदार संजय राऊत आणि लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना थेट इशारा देत बैठकीला गैरहजर राहणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
शरद पवारांचा फोन आला : राऊत
यावेळी राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचाही फोन आला होता. पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना यापुढे मोकळीक देता कामा नये, अशी भूमिका पवारांनी व्यक्त केल्याचे संजय राऊत म्हणाले. “मतदारसंघात जाऊन त्यांच्याविरोधात सभा घ्यायच्या, जनतेसमोर त्यांची भूमिका मांडायची. आवश्यक असेल तर मी स्वतः त्या भागात सभा घेण्यासाठी तयार आहे,” असे पवारांनी सांगितल्याचे राऊत यांनी म्हणाले.
..तर त्याला धडा शिकवायचाच : राऊतांचा इशारा
यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून देत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले. पत्रकार परिषद संपवताना त्यांनी, “आता कोणीही फुटला तर त्याला धडा शिकवायचाच,” अशा कडक शब्दांत इशारा दिला.
शिंदेसेनेसह भाजपवर घणाघाती टीका
“महाराष्ट्राचा गोलपीटा झाला आहे हे मान्य केलं पाहिजे. आमदार, खासदार निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावर जातात. यात भाजपाचं योगदान आहे. शिंदे गटातील सगळे दलाल आहेत. हे दलाल निर्माण कऱण्याचं काम भाजपाचं करुन देश आणि राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासला आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त करत संजय राऊतांनी शिंदेसेनेसह भाजपवर घणाघाती टीका केली. दरम्यान, आजच्या बैठकीला कोणते खासदार उपस्थित राहतात आणि कोण गैरहजर राहतात, यावरून ठाकरे गटाची पुढील रणनीती ठरणार आहे. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर पक्ष कोणती कारवाई करतो, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?
पक्ष सोडण्यापूर्वी बंडखोर खासदारांनी मंजूर केलेल्या ठरावात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरण होण्याबाबतच्या भीतीचा उल्लेख करण्यात आला आहे. या ठरावात म्हटले आहे की, पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीपासून भरकटला आहे आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना करण्यात आली नव्हती. तसेच, तृणमूल काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिल्याचा संदर्भ देत, भविष्यात ‘शिवसेना ठाकरे गट देखील काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते, अशी भीती या ठरावात व्यक्त करण्यात आली होती. परिणामी, पक्ष नेतृत्वावरील अविश्वासामुळे बंडखोर खासदारांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, बंडखोर खासदारांनी स्वतःला स्वतंत्र गट म्हणून घोषित केलेले नाही; त्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार, त्यांनी थेट शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमध्ये त्यांना ‘स्वतंत्र गट’ असे संबोधले जात असले तरी, फुटलेल्या खासदारांनी त्यांच्या ठरावात असा दावा करण्यात आला आहे की, ते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन झाले आहेत.
बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार
बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार आहे. ठाकरे गटाकडून तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोटीसवर प्रत्येक खासदारांकडून उत्तर मागितलं जाणार आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी केवळ काही तासांचाच वेळ दिला जाईल. दिलेल्या वेळेत उत्तर आलं नाही, तर मग पुढे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे असणार आहेत. सोबतच नव्या गटाला मान्यता देण्याचे अधिकार देखील लोकसभा अध्यक्ष यांच्याकडेच राहतील. शिवसेना दोन्ही गटांची पुढची लढाई आता लोकसभा अध्यक्षांच्या दारात जाईल. लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार, याकडे आता पुढचं लक्ष असेल.
ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या घराबाहेर मोठी सुरक्षा वाढवली
ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटू शकतात, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये या अनुषंगाने स्थानिक पोलिसांकडून खासदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही काल झालेल्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित खासदारांना इशारा दिला होता. त्यानूसार खबरदारी म्हणून पोलिसांकडून संबंधित खासदार यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवल्याचे कळते. मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेरही मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान नाॅटरिचेबल असलेल्या खासदारांचा वेगळा गट होत असताना. या गटाचं नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.










