कॉलेजमधील वादातून तरुणावर चाकूने हल्ला
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
कॉलेजमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचे रूपांतर टोकाच्या वादात होऊन एका १९ वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना गुलमोहर रोडवरील आनंद शाळेसमोर घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक सोमनाथ लांडगे या विद्यार्थ्याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. अभिषेक हा एका औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याचा मित्र संतोष महाडिक आणि आरोपी विशाल नागरगोजे यांच्यात कॉलेजमध्ये दुपारी भांडण झाले होते. याच वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपी अविनाश विश्वास जायभाय याने संतोषला फोनवरून शिवीगाळ केली आणि चर्चेसाठी बोलावले.
सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अभिषेक, संतोष आणि रोहन लांडगे हे नाथकृपा इंटरप्राईजेस कार्यालयाबाहेर आले असता, तिथे अविनाश जायभाय आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. यावेळी झालेल्या झटापटीत अविनाशने अभिषेकला संतोष समजून त्याच्यावर चाकूने वार केले. अभिषेकच्या डाव्या पायाच्या मांडीवर चार ठिकाणी जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. जखमी अभिषेकवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अविनाश जायभाय व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रियंका राऊत करत आहेत.
विठाई लॉनसमोरील २६ हजारांचे पत्रे लंपास; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर: शहरातील काटवण खंडोबा परिसरातील विठाई लॉनसमोर सुरू असलेल्या शेडच्या कामासाठी आणलेले २६ हजार ६०० रुपये किमतीचे लोखंडी पत्रे चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमोल काशिनाथ काडळकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अमोल काडळकर हे विठाई लॉन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या लॉनच्या समोर शेडचे काम सुरू असल्याने त्यांनी सुयोग पत्रा डेपो येथून विविध आकाराचे ८८ पत्रे आणून ठेवले होते. ९ मे रोजी पहाटेच्या सुमारास काम संपवून घरी जाताना सर्व पत्रे जागेवरच होती. मात्र, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कामगार कामावर आले असता त्यांना पत्रे कमी असल्याचे दिसून आले. काडळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, १३ फूट लांबीचे एकूण १४ पत्रे चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
परिसरात सर्वत्र शोध घेऊनही पत्रे मिळून न आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चोरीस गेलेल्या एका पत्र्याची किंमत १९०० रुपये आहे. पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस हवालदार शरद वाघ करत आहेत..
जमिनीच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर: शहरातील सर्जेपुरा भागातील रंगभवन येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी आणि कुर्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महेश भास्कर काळोखे (वय २९, रा. रंगभवन, सर्जेपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात शिव अण्णासाहेब सोनवणे, ओम अण्णासाहेब सोनवणे, कोहिनूर अण्णासाहेब सोनवणे (सर्व रा. सर्जेपुरा) आणि यश सागर सोळशे (रा. बोल्हेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. शिव सोनवणे आणि इतर आरोपींनी फिर्यादी महेश काळोखे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेला भाऊ दीपक आणि आई लक्ष्मी यांनाही आरोपींनी कुर्हाडीच्या दांड्याने मारहाण करत जखमी केले. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ब्रँडेडच्या नावाखाली विषारी शॅम्पू; नागापूरच्या आठवडे बाजारातून टोळी गजाआड
अहिल्यानगर – नामांकित कंपन्यांच्या शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये घातक रसायनांचे मिश्रण भरून ग्राहकांची फसवणूक करणार्या टोळीला एमआयडीसी. पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागापूर येथील आठवडे बाजारात ही कारवाई करण्यात आली. या टोळीकडून १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मानवी आरोग्याशी खेळणार्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नागापूरच्या सह्याद्री चौकात एक तरुण स्वस्त दरात ब्रँडेड शॅम्पू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने सापळा रचून शानमोहम्मद पप्पूखान आलबी (वय २५, रा. उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार रब्बानी रज्जाक अब्बास आणि फैजान अहमद अली खान यांच्या मदतीने हा बनावट शॅम्पूचा गोरखधंदा सुरू असल्याची कबुली दिली. हे आरोपी डव, लिनीक प्लस आणि पॅन्टीनसारख्या मोठ्या कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये अज्ञात केमिकल आणि पावडरचे मिश्रण भरून ते अस्सल असल्याचे भासवून विकत असत.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख १८६ रुपयांच्या बनावट शॅम्पूच्या बाटल्या, पॅकिंगचे साहित्य आणि रसायने जप्त केली आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे अधिकारी किरीत गुणवंतराय पंड्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि प्रभारी अधिकारी माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही धडक कारवाई पूर्ण केली. ग्राहकांनी अशा स्वस्त आणि बनावट वस्तूंना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे बसस्थानकावर महिलेची फसवणूक
अहिल्यानगर – शहरातील पुणे बसस्थानक परिसरात एका अनोळखी भामट्याने ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन करून ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६५ वर्षीय फिर्यादी महिला कामानिमित्त पुणे येथे जाण्यासाठी बस स्थानकावर आल्या होत्या. दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास त्या बसची वाट पाहत असताना, एक अज्ञात तरुण त्यांच्या जवळ आला. त्याने महिलेला ’आई, उन्हात नका बसू, सावलीत चला’ असे म्हणून विश्वासात घेतले. बसमध्ये चढताना गर्दी होईल, त्यामुळे गळ्यातील दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी माझ्याकडे द्या, असे त्याने महिलेला सांगितले.
घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास ; भुतकरवाडी परिसरातील घटना
अहिल्यानगर – शहरात चोर्यांचे सत्र सुरूच असून, भुतकरवाडी परिसरातील पंपिंग स्टेशन रोडवर एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इजित प्रेमराज शेकडे हे एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ते आपल्या कुटुंबासह पुण्यात एका लग्नासाठी गेले होते. दि. ८ मे रोजी सकाळी त्यांनी आपले घर कुलूप लावून बंद केले होते. दरम्यान, चोरट्यांनी घराचा कडीकोंडा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातील सामानाची उचकपाचक करून सोन्याच्या दोन अंगठ्या, रोख रक्कम आणि लॅपटॉप असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
११ मे रोजी पहाटे शेकडे कुटुंब घरी परतले असता, त्यांना घराच्या दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी तातडीने तोफखाना पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक दळवी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.










