- जाहिरात -spot_img
breaking news

चौघांनी मजुराला लुटले, तरुणावर जीवघेणा हल्ला, अवैध धंद्यांवर छापेमारी, कुठे काय घडलं पहा

 

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
तालुक्यातील धनगरवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी दांडयाने आणि टनक वस्तूने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनगरवाडी येथील शिकारे वस्तीवर हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ही घटना घडली. फिर्यादी सचिन बाबासाहेब शिकारे यांना गावातीलच वैभव हरिभाऊ वाकडे आणि आदित्य हरिभाऊ वाकडे यांनी जुन्या वादातून अडवले. काही वेळातच त्यांचे जेऊर येथील मित्र ओम आढाव, गौरव जरे, कृष्णा तोडमल आणि तुषार वाघ हे अशोक लेलँड गाडीतून त्या ठिकाणी आले.
या सर्वांनी मिळून सचिन यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ओम आढाव याने सचिन यांच्या डोयात टनक वस्तूने प्रहार केला, तर इतरांनी लाकडी दांडयाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी देऊन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. जखमी तरुणावर शेंडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.

अवैध धंद्यांवर छापेमारी
अहिल्यानगर ः जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली असून, मंगळवारी विविध ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच अवैध दारू विक्रेते आणि एका जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली असून एकूण ३७,९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पथकांनी श्रीगोंदा, पारनेर आणि अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. श्रीगोंदा परिसरात दोन ठिकाणी गावठी दारू विक्री करणार्‍यांवर तर एका ठिकाणी जुगार खेळणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. पारनेरमध्ये एका दारू विक्रेत्याला पकडण्यात आले, तर अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोठ्या कारवाया करून २४,४०० रुपयांचा माल हस्तगत केला.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यामध्ये कोठेही असे अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे असे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा :  पेट्रोल पंपाच्या नावाखाली व्यावसायिकाला 84 लाखांना गंडा, जास्त नफ्याचे आमिष भोवले 58 लाख गेले...

भरदिवसा घरफोडी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील कोर्ट गल्ली भागात भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून १ लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगल भाऊसाहेब फुलसौंदर या महिला फिर्यादी विठ्ठल मंदिराजवळ राहतात. त्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असताना चोरट्यांनी ही संधी साधली. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे स्क्रू काढून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचा कप्पा कशाच्या तरी साहाय्याने उचकटून त्यातील मौल्यवान दागिने लंपास केले. यामध्ये ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण, ४० हजार रुपयांचा सोन्याच्या मण्यांचा सर, ४० हजार रुपयांचे तीन पदरी गंठण आणि १२ हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संभाजी गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

चौघांनी मजुराला लुटले
एटीएममधून जबरदस्तीने काढले १० हजार रुपये
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
हैदराबाद येथून काम उरकून परतलेल्या एका मजुराला चार अनोळखी इसमांनी गाठून बेदम मारहाण केली. आमच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे, असा बहाणा करून या टोळीने फिर्यादीला धमकावत चक्क एटीएममधून १० हजार रुपये काढायला लावून ते लुटले. ही खळबळजनक घटना नगर-पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास घडली.
राहुल चंद्रभान दारकुंडे (वय ३०, रा. घुटेवाडी, श्रीगोंदा) हे सुपा एमआयडीसीतील एका कंपनीत फिटर म्हणून काम करतात. १३ मे रोजी पहाटे राहुल आणि त्यांचा सहकारी हैदराबादहून बसने अहिल्यानगरमधील चांदणी चौकात उतरले. तिथून ते माळीवाडा बसस्थानकाकडे पायी जात असताना पाटील रुग्णालयाजवळ मागून आलेल्या एका दुचाकीचा त्यांना धक्का लागला. यावरून दुचाकीस्वाराने राहुल यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्याच वेळी दुसर्‍या दुचाकीवरून आणखी तीन तरुण तिथे आले.
या चौघांनी राहुल यांना ओढत नेऊन लेराब्रुस मैदानात नेले. तिथे काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून माळीवाडा येथील बँकेच्या एटीएमवर नेले. तिथे राहुल यांना १० हजार रुपये काढायला लावून ते हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपींनी त्यांना स्वस्तिक बसस्थानकासमोरील एका निर्जन ठिकाणी नेऊन पुन्हा मारहाण केली. राहुल यांचे मेव्हणे अविनाश गव्हाणे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. आरडाओरडा झाल्याने आरोपी दुचाकीवरून पसार झाले. सध्या राहुल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, कोतवाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ