- जाहिरात -spot_img
breaking news

मृगाच्या ‘बेडका’ने दिला दगा, आर्द्राच्या ‘गाढवा’वरच भिस्त !

मृग नक्षत्र सरले तरी मान्सूनची हजेरी नाही; शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

पावसाअभावी जामखेडमध्ये खरीप पेरण्या ठप्प; ५८ हजार हेक्टर क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत

जामखेड : जून महिना संपण्याच्या दिशेने वाटचाल करीत असतानाही जामखेड तालुक्यात मान्सूनने अपेक्षित दमदार हजेरी लावलेली नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत.यंदा २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राची सुरुवात झाली होती, मात्र संपूर्ण रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. त्यानंतर ८ जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात झाली. यंदा मृग नक्षत्राचे वाहन ‘बेडूक’ असल्याने सुरुवातीला चांगल्या पावसाची चिन्हे दिसत होती. मात्र, मृगाचा संपूर्ण कालावधी संपत आला तरी पावसाने हुलकावणीच दिली. हे नक्षत्र २१ जून रोजी संपणार आहे. त्यामुळे आता २२ जून रोजी सुरू होणाऱ्या ‘आर्द्रा’ नक्षत्रावर शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त आहे. आर्द्रा नक्षत्राचे वाहन ‘गाढव’ असून, हा नक्षत्र तरी बरसणार काय, याकडे शेतकरी चातकासारखी वाट पाहत आहे. अधूनधून पडणाऱ्या हलक्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने तालुक्यातील सुमारे ५८ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची पेरणी रखडली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांच्या नजरा आता आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत.

 

साधारणपणे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सून सक्रिय होऊन पेरणीच्या कामांना वेग येतो. यावर्षी मात्र मान्सूनची वाटचाल संथ असल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळताना दिसत आहेत. मृग नक्षत्राचा कालावधी संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. खरीप हंगामासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. अनेकांनी मे महिन्याच्या अखेरीसच बियाणे व खतांची खरेदी करून शेतीची तयारी पूर्ण केली. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे ही तयारी सध्या निष्क्रिय ठरत आहे. शेतकऱ्यांच्या घरात बियाण्याच्या पोत्यांचे ढीग तयार आहेत, पण शेतात पेरणी करण्यासाठी आवश्यक ओलावा नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा :  कर्नाटकमध्ये आता शिवकुमार पर्व...सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

गेल्यावर्षी याच कालावधीत तालुक्यातील सुमारे ७० ते ८० टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे विपरीत आहे. जूनचा अर्ध्याहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही बहुतांश क्षेत्र कोरडे असून पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली नाही. जामखेड तालुक्यात खरीप हंगामात उडीद, मूग, तूर, सोयाबीन आणि मका ही नगदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या पिकांवर हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, पावसाचा विलंब वाढल्यास पेरण्यांचे नियोजन बदलण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. तसेच उत्पादनात घट होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

 

यावर्षी अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कांद्याच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच आता मान्सूनच्या उशिरामुळे खरीप हंगामही संकटात सापडल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. सध्या तालुक्यात तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास असून उन्हाची तीव्रता कायम आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळे जमिनीतील ओलावा आणखी कमी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

दरम्यान, आगामी आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास पेरणीच्या कामांना वेग येईल आणि खरीप हंगामाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. तोपर्यंत मात्र जामखेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडेच लागून राहणार आहेत.

 

पावसाअभावी पेरण्या रखडल्या
जामखेड तालुक्यात यंदा मृग नक्षत्र संपूर्णपणे कोरडे गेल्याने खरीप हंगामातील पेरण्या ठप्प झाल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा पंधरवड्यात पेरणीला सुरुवात होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने हा अंदाज फोल ठरला आहे. २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होत असून, या नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यास पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. अन्यथा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या संपूर्ण तालुक्यात पावसाअभावी पेरण्या रखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा :  कान्हूर पठारमध्ये संतापजनक प्रकार, अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, पोलिसांनी केले असे...

मागील वर्षी अवकाळीचा कहर; यंदा पावसाचा दुष्काळ
गतवर्षी मे महिन्यांत अवकाळी पावसाने जामखेड तालुक्याला झोडपले होते. या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावली, तर घरांचेही नुकसान झाले होते. याउलट यंदा खरीप हंगामाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. अवकाळीच्या नुकसानीतून सावरत असतानाच आता पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ