सभापती राम शिंदेंकडून विखे विरोधकांची मोट बांधण्याची तयारी पूर्ण | थोरात, कोल्हे, गडाख, घुले, तनपुरे, लंके असे सारेच एकवटले
सारीपाट / शिवाजी शिर्के-
आशिया खंडातील मोठी जिल्हा सहकारी बँक म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावेळी देखील विखे पाटलांच्या विरोधात पक्षांतर्गत आणि पक्षविरोधातील सारे एकवटले असल्याचे पहिल्या टप्प्यात दिसून येत आहे. यावेळी भर पडलीय ती प्रा.राम शिंदे यांची! राम शिंदे यांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी पायाला भिंगरी बांधलीय. जिल्ह्यातील मातब्बरांच्या भेटीगाठी घेत ही मोट अधिक भक्कम करणाऱ्या राम शिंदे यांची जिल्हा बँकेत एंट्री होणार हे नक्की! त्यांच्या कर्जत- जामखेड या मतदारसंघातील विखे समर्थकांकडून कायम होणारी गोची या निवडणुकीत कायमची संपुष्टात आणण्याचा चंग राम शिंदे यांनी बांधला असतानाच आता त्यांनी विखे पाटलांना जिल्हा बँकेपासून रोखण्यासाठी त्यांच्या विरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचाली गतीमान केल्या असल्याचे दिसते. राम शिंदे यांच्या या राजकीय डावपेचांना पडद्याआडून मुख्यमंत्री देवाभाऊंचा सिग्नल असल्याची चर्चा आता लपून राहिलेली नाही. मात्र, काहीही झाले तरी ही निवडणूक हातची सुटणार नाही याची काळजी विखे पाटलांकडून घेतली जात असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही.
मागील निवडणुकीची पुनरावृत्ती होणार का?
जिल्हा बँकेच्या पाच वर्षापूव झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत स्व. अजित पवार यांनी लक्ष घातले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत दिले. थोरात, गडाख, घुले, कोल्हे, काळे, तनपुरे, कर्डिले असे सारे दिग्गज बाळासाहेब थोरात यांनी एकत्र आणले होते. त्यातूनच पवार समर्थक पारनेरमधून निवडून आलेेले उदयराव शेळके यांची अध्यक्षपदी वण लागली. पुढे शेळके यांच्या अकाली निधनानंतर पवार- थोरात गटाचे बहुमत असतानाही आ. स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी विखे पाटलांची साथ घेतली आणि पवार- थोरात गटाला सत्तेपासून बाजूला केले. यातूनच विखे पाटलांच्या हातात बँकेची सुत्रे आली. आता होणाऱ्या निवडणुकीत तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली असून या साऱ्याचा केंद्रबिंदू संगमनेरच्या जोडीने आता राम शिंदे यांच्याकडे देखील झाला आहे.
राम शिंदे यांना सोबत घेण्याच्या तयारीत!
विधान परिषदेचे सभापती असणारे राम शिंदे हे पहिल्यांदाच जिल्हा बँक निवडणुकीत उतरणार आहेत. कर्जत आणि जामखेड या दोन्ही जागा जिंकून येतील अशा ठरावांची संख्या त्यांनी गाठली असल्याची चर्चा आहे. श्रीगोंद्यातून आ. विक्रम पाचपुते आणि राहुल जगताप, पारनेरमधून खा. निलेश लंके, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, अकोल्यातून वैभव पिचड, कोपरगावमधून आ. विवेक कोल्हे, श्रीरामपूरमधून ससाणे- मुरकुटे, राहुरीतून आ. प्राजक्त तनपुरे, नेवासामधून शंकरराव गडाख, राहत्यातून राजेंद्र पिपाडा, शेवगावमधून घुले पाटील, पाथडतून आ. राजळे यांच्या जोडीने प्रताप ढाकणे यांना सोबत घेण्याच्या तयारीत शिंदे असल्याची चर्चा आहे.
विखे पाटलांसोबत कोण कोण राहू शकते!
राम शिंदे यांनी विरोधकांच्या गाठीभेटी चालू केल्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील शांत कसे बसू शकतात. त्यांनी देखील मोर्चेबांधणी चालूच ठेवली आहे. राहात्यातून स्वत: सुजय विखे पाटील हेच उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेवासामधून आ. विठ्ठलराव लंघे, संगमनेरमधून आ. अमोल खताळ, पारनेरमधून आ. काशिनाथ दाते, नगर शहरातून आ. संग्राम जगताप, नगर तालुक्यातून आ. अक्षय कर्डिले यांची साथ विखे पाटलांना मिळणार असल्याचे मानले जाते.
जामखेडमधून स्वत: तर कर्जतमधून पत्नी उमेदवार!
जिल्हा बँकेची निवडणूक असली तरी ती अस्तित्वाची असणार असल्याचे गृहीत धरुन गेल्या दोन वर्षांपासून राम शिंदे हे या निवडणुकीच्या तयारीला लागले होते. साम- दाम- दंड या त्रिसुत्रीत काहीही कमी पडू न देता त्यांनी ही निवडणुक ठरावाच्या पहिल्या टप्प्यात हाती घेतली. राळेभात आणि पिसाळ यांच्या वाट्याला तीस टक्के ठराव देखील यातून जाऊ शकले नाहीत. सोसायटी मतदारसंघातील जामखेड तालुक्यातून स्वत: तर कर्जतमधून पत्नीची उमेदवारी करण्याचा विचारापर्यत राम शिंदे आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
रामभाऊंच्या डोक्यातील खटका जाता जाईना!
देवेंद्र फडणवीस यांच्या खास मजत असणाऱ्या राम शिंदे यांच्या डोक्यात विखे पाटलांविषयी असणारा राग- रोष काही केल्या कमी व्हायला तयार नाही. त्याला वेगवेगळी कारणे असतील. देवाभाऊंच्या नंतर कोण या प्रश्नाच्या उत्तरात जी दोन- तीन नावे घेतली जातात त्यात राधाकृष्ण विखे पाटलांचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. देवाभाऊंसाठी काहीही करण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या राम शिंदे यांनी जिल्हा बँक विखे पाटलांच्या ताब्यात जाणार नाही याची काळजी घेताना त्यातून विखे पाटलांचे राजकीय महत्व कमी करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे मानले जाते.
कर्जत- जामखेडमधील विखे समर्थकांना राम शिंदेंकडून पहिल्यांदाच थेट आव्हान!
कर्जत- जामखेडमधील विखे समर्थकांकडून राम शिंदे यांची कायमच राजकीय गोची केली जात असल्याची भावना शिंदे समर्थकांमध्ये आहे. कर्जतचे अंबादास पिसाळ यांची विधानसभेतील उमेदवारी विखे पाटलांमुळे झाली आणि पिसाळ यांच्या उमेदवारीमुळे आपण पराभूत झालो अशी भावना राम शिंदे यांच्या मनात कायम आहे. तिकडे जामखेडमध्ये राळेभात परिवार हा विखे पाटलांशी एकनिष्ठ! राळेभात यांच्याकडून देखील राम शिंदे यांना अनेकदा अडचणीत आणण्याचे काम झाले. पिसाळ आणि राळेभात या दोघांनाही विखे पाटील जिल्हा बँकेत संधी देतात. यावेळी या दोघांनाही जिल्हा बँकेत जाऊच द्यायचे नाही असा चंग राम शिंदे यांनी बांधला असल्याचे दिसते. त्यामुळेच राम शिंदे यांनी या दोन्ही तालुक्यातून आपल्या नावाचे सोसायटी मतदारसंघातील ठराव घेतले असल्याचे मानले जाते.










