नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
जगभरात सगळीकडे महागाईच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. पेट्रोल,डिझेल, सीएनजी आणि दैनंदिन गोष्टीच्या वस्तू महागल्यानंतर आता या महागाईचा फटका तुमच्या आमच्या सोशल मीडिया वापरला बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी Meta ने एक मोठी घोषणा केली आहे. त्याचा थेट परिणाम सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्स वापरणाऱ्या यूजर्सवर होणार आहे. कंपनीने आता इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी नवीन पेड सबस्क्रिप्शन प्लॅन्स सादर केले आहे. विशेष म्हणजे हे प्लॅन्स भारतासह जगभरातील यूजर्ससाठी लागू करण्यात येणार आहेत.
मेटा आता आपल्या अॅप्सची ‘प्लस’ व्हर्जन आणत आहे. यात प्रीमियम प्लॅनमध्ये पैसे भरून सब्स्क्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सना एक्सक्लुझिव्ह टूल्स, कस्टमायझेशन फीचर्स आणि अधिक चांगला अनुभव मिळणार आहे. हे फीचर्स मोफत वापरकर्त्यांना उपलब्ध नसतील.
कंपनीने निर्णय का घेतला?
कंपनीचा हा निर्णय केवळ जाहिरातींवर आधारित कमाईवर अवलंबून न राहण्याच्या रणनीतीचा भाग मानला जात आहे. आतापर्यंत Meta ची मोठी कमाई जाहिरातींमधून होत होती. मात्र आता कंपनी प्रीमियम सबस्क्रिप्शनद्वारे नवीन कमाईचे मॉडेल तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. Meta च्या मते, अनेक यूजर्स अधिक सुरक्षित, प्रीमियम सुविधेसाठी पैसे देण्यास तयार आहेत. त्यामुळे कंपनीने खास फीचर्ससह पेड प्लॅन्सची घोषणा केली आहे.
किती रुपयांच्या प्लॅनची केली घोषणा ?
Instagram Plus आणि Facebook Plus साठी दरमहा 3.99 डॉलर म्हणजेच अंदाजे 387 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. तर WhatsApp Plus साठी दरमहा 2.99 डॉलर म्हणजेच सुमारे 290 रुपये मोजावे लागतील. मात्र भारतात किती किंमत असेल हे कंपनीने अजून अधिकृतपणे जाहीर केले नाही.
काय सुविधा असेल?
WhatsApp Plus प्लॅनमध्ये यूजर्सना कस्टम थीम, वेगळे रिंगटोन्स, प्रीमियम स्टिकर्स आणि अधिक चॅट्स पिन करण्याचा पर्याय दिला जाईल. तर instagram Plus वर यूजर्सना त्यांच्या स्टोरी किती वेळा पुन्हा पाहिली गेली हे पाहता येणार आहे. तसेच व्ह्यूअर्स लिस्टमध्ये नाव न दाखवता स्टोरी प्रिव्ह्यू पाहता येणार आहे. त्यासोबतच 24 तासांपेक्षा जास्त वेळ स्टोरी ठेवण्याची सुविधा दिली जाणार आहे.










