- जाहिरात -spot_img
breaking news

जंतरमंतरवर राडा! सोनम वांगचुक यांच्याबद्दल काय घडलं पहा, पवार, ठाकरेंचा हल्लाबोल…

अभिजीत दिपकेंची आमरण उपोषणाची घोषणा |
नवी दिल्ली | वृत्तसंस्था-
नीट परीक्षेतील कथित फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात शनिवारी सकाळी मोठ्या घडामोडी घडल्या. गेल्या 20 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी ( दि. 18 जुलै) रोजी पहाटे साडेसात वाजताच्या सुमारास आंदोलनस्थळावरून बळजबरीने हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर जंतरमंतरवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर कॉकरोच जनता पाटचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित कॉकरोच जनता पाटचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांनी जंतर-मंतरवरून इतर कार्यकर्त्यांनाही हटवण्यास सुरुवात केली, ज्याला कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. या घटनेनंतर कॉकरोच जनता पाटचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिल्ली पोलिसांनी मारहाण केली आणि त्यानंतर ताब्यात घेतले. तसेच सोनम वांगचुक सरांना शिवीगाळ करण्यात आली, असा आरोप केला आहे.सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर अभिजीत दीपके यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, मी आजपासून माझे आमरण उपोषण सुरू करत आहे. 20 जुलै रोजी आमचा नियोजित मोर्चाही निघेल आणि माझे उपोषणही सुरूच राहील. सोनम सरांना इथून उचलून नेल्याने हे आंदोलन संपवता येईल, असा संभ्रम प्रशासनाला आहे, पण हे आंदोलन संपणार नाही. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मला दिल्ली पोलिसांनी मारहाण केली आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा खळबळजनक दावा दिपके यांनी केला आहे.

जंतरमंतरवर राडा! दिपकेंवर फेकली शाई
दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पाटचे नेते अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. याच दरम्यान एका महिलेने अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली, ज्यामुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तत्परता दाखवत त्या महिलेला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या पोलीस या महिलेची कसून चौकशी करत आहेत. आपल्यावर शाई फेकल्याच्या या घटनेनंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. निळा माझा आवडता रंग आहे असे म्हटले. मी आजपासून माझं आमरण उपोषण सुरू करत आहे. 20 जुलै रोजी आमचा मोर्चा देखील निघेल आणि माझं उपोषणही सुरूच राहील. सोनम सरांना आत टाकून किंवा इथून हटवून हे आंदोलन संपवता येईल, असं या लोकांना वाटत आहे. पण हे आंदोलन संपणार नाही.

हे सुद्धा वाचा :  नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; आमदार सत्यजीत तांबे आक्रमक

घटनास्थळी काय घडलं?
पहाटेच्या वेळी साधारण 10 पोलीस अधिकारी पाठवले, जे स्वतःला वैद्यकीय पथक (मेडिकल टीम) म्हणवून घेत होते. पण ते डॉक्टरसारखे दिसत नसल्याने ते पोलीसच आहेत, हे आमच्या लक्षात आले आणि त्यांनी सर्व स्वयंसेवकांना बाजूला होण्याचे आदेश दिले. आम्ही त्यांना वारंवार थोडा वेळ थांबण्याची विनंती करत होतो, पण अचानक त्यांनी हायकोर्टाचा (उच्च न्यायालयाचा) आदेश असल्याचं सांगत सोनम सरांना घेऊन जाणं आवश्यक असल्याचं जाहीर केलं, असं एका आंदोलनकर्त्याने सांगितले.

पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
दिल्लीत जंतर मंतर इथं गेल्या 21 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात उपाचरासाठी दाखल केले आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू यांनी सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, सोनम वांगचुक यांना सकाळी सात वाजून 40 मिनिटांनी रुग्णालयात आणलं गेलं. उपोषणामुळे त्यांचं शरीर अशक्त बनलं असून शरीरात पाण्याची कमतरता आहे. गेल्या 21 दिवसांपासून उपोषण करूनही सोनं वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. मात्र ते अशक्त झाले आहेत आणि वजन घटल्याचंही डॉक्टरांनी म्हटले. डॉक्टरांनी तपासणी केली होती तेव्हा प्रकृती ठीक होती आणि आता सरकारी डॉक्टर वेगळीच माहिती देतायत. सोनम यांना फोनही घेऊन जाऊ दिला नाही. सफदरजंग रुग्णालय हे तुरुंग असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप सोनम यांच्या पत्नीने केला आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या चुकांवर सरकार का पांघरुण घालतंय”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार ते एकदा जाहीर करावं, कारण वांगचुक हे स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला तयार झालेले आहेत. यापूर्वीच नीट पेपर लीकमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मग एवढ्या आत्महत्या होऊन सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलंय की यांच्या चुकांवर सरकार पांघरुन घालतयं.” असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

…तर दिल्ली पोलिसांनी आदेश दाखवावा : उद्धव ठाकरे
आज सकाळी जी कारवाई झाली ती कोर्टाच्या आणि वैद्यकीय सल्लानुसार करण्यात आल्याचा दावा दिल्ली पोलिसांकडून केला जात आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घायला लावले होते. त्यांना उचलून रुग्णालयात टाका असे कुठे हि म्हटलेलं नाही, असे असेल तर दिल्ली पोलिसांनी आदेश दाखवावा.

हे सुद्धा वाचा :  गुन्हेगारांशी संबंध; पोलीस हवालदार शंकर चौधरी निलंबित

केंद्र सरकारची बघ्याची भूमिका : शरद पवार
“पाच-सहा दिवसांत अटक करतील, नेमकं तसं झालं आहे. त्यांची मागणी काय होती, तर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा. का तर त्यांच्याकडे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी होती. परंतु त्यांनी ती जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही. त्यांच्या परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झाला. आंदोलनातून मागणी होत आहे, तरी केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. शेवटी त्यांच्या मागणीसाठी इतर राजकीय पक्ष देखील उभे राहिले.” अशी पहिली प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. पुढे शरद पवार म्हणाले “काँग्रेसच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी गेले. राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे गेल्या. सर्व जण एक सामूहिक मागणी करत होते. हे आवाक्याच्या बाहेर गेल्याचं लक्षात आलं, त्यानंतर अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अटकसत्र झालं. बघुयात. सोनम वांगचूक यांना अटक जरी झाली, तरी आंदोलन सुरू राहणार. मागणी रास्त होती. विद्यार्थ्यांसाठी होती.

ठरल्यानुसार २० जुलै रोजी आपण संसदेवर जाऊ : अभिजीत दिपके
अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन ताब्यात घेतलं असा आरोप सोशल माीडियावर पोस्ट करुन केला आहे. यामुळे विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ शेअर करत ‘चलो संसद’चा नारा दिला होता. त्यानुसार २० जुलैला हे आंदोलन निघाणार होते. मात्र, ते सध्या रुग्णालयात आहेत. “तुम्ही जंतर-मंतरवर या. इथून आपली चळवळ सुरु राहिलं. ठरल्यानुसार २० जुलै रोजी आपण संसदेवर जाऊ” असे आवाहन अभिजीत दिपके यांनी आंदोलनस्थळावरुन केलं आहे. सोनम वांगचूक यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रातून आणि बॉलिवूडमधून पाठिंबा वाढत चालला होता.

हा सत्तेचा माज, जो कायम चालणार नाही….”; सोनम वांगचुक यांना हटवताच जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल
दिल्लीच्या जंतर मंतर येथे 21 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी जबरदस्तीने उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. अचानक पोलिसांनी केलेल्या कृतीमुळे आंदोलनस्थाळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आंदोलन सुरुच राहणार असल्याची मोठी घोषणा कॅाकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे. या संपूर्ण घटनेवर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील या सर्व घटनेवर सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले, “हे भ्याड सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवले. यासोबतच आंदोलनकर्त्यांवर देखील पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचुक हे आंदोलनाला बसले होते. पण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने त्यांच्याशी साधी चर्चा करण्याचा देखील शिष्टाचार दाखवला नाही. हा सत्तेचा माज आहे, जो कायम चालणार नाही हे इथल्या उन्मत्त सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे..,” असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

हे सुद्धा वाचा :  नारायणगव्हाण रस्त्याबाबत अंतिम इशारा....16 जुलै रोजी प्रशासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

वांगचूक यांना उचलून नेणारं मोदी सरकार डरपोक : किरण काळे
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नीट पेपर फुटी नंतर तब्बल 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. 21 जूनला झालेल्या फेरपरीक्षेकडे तब्बल पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी नैराश्यातून पाठ फिरवली. देशातील तरुणाईच्या भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी राजकारण विरहित राष्ट्रीय स्तरावरच आंदोलन दिल्लीमध्ये वैज्ञानिक तथा शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक, अभिजीत दिपके यांच्यासह हजारो तरुणांनी उभं केलं आहे.

त्यांच्या आमरण उपोषणाचा एकविसावा दिवस होता. मात्र आंदोलन चिरडण्यासाठी त्यांना जोर जबरदस्तीने उचलून नेत रुग्णालयात डांबण्यात आल आहे. वांगचूक यांना जबरदस्तीने उचलून नेणार मोदी सरकार हे डरपोक असल्याची टीका ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या या कृतीमुळे देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. काळे म्हणाले, देशात लोकशाही उरलेली नाही. मागच्या 20 दिवसांत सरकारचा एकही प्रतिनिधी साधा फिरकला सुद्धा नाही. आंदोलकांशी संवाद साधण्याऐवजी दडपशाही केली जात आहे. तरुणाईचा आवाज बनलेले अभिजीत दिपके यांना झालेली मारहाण, आंदोलन स्थळी युवती आंदोलकांशी केलेले गैरवर्तन, विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज यातून देशामध्ये नवा हिटलर जन्माला आला आहे हेच सिद्ध होते. सरकारची हीच भूमिका कायम राहिली तर नजीकच्या काळामध्ये भारताचा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. हा वणवा आता सरकार रोखू शकत नाही. सरकारच्या या दडपशाहीचा आम्ही तमाम अहिल्यानगरकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो. तरुणाईच्या भवितव्याच्या संरक्षणासाठी उभे राहिलेले हे आंदोलन राजकारण विरहित आहे. ते तसेच राहणे आवश्यक आहे. वांगचूक यांना मागील दोन दिवसांपासून देशभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. तरुणाई, नागरिक स्वयंस्फूतने रस्त्यावर उतरत आहेत, असे काळे म्हणाले. अहिल्यानगर शहरात देखील शुक्रवारी सायंकाळी शेकडो विद्याथ, विद्यार्थिनी, सजक नागरिकांनी काढलेला कॅण्डल मार्च समाजाची यावर असणारी तीव्र भावना व्यक्त करणारा आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ