मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा नव्या आणि हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी सालबर्डी या चित्रपटातील ‘मंजुळा’ हे खास गाणं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘मंजुळा’ या गाण्यात सोनालीचा ग्लॅमरस आणि एनर्जेटिक अवतार पाहायला मिळणार असून आकर्षक कोरिओग्राफीमुळे हे गाणं विशेष ठरणार आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी या गाण्याची रचना केली आहे. गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांनी लिहिले असून संगीत पद्मनाभ गायकवाड यांचे आहे. तर आनंदी जोशी हिने आपल्या सुरेल आवाजात हे गाणं सादर केलं आहे.
या गाण्याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली की, “हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. यात एक वेगळी ऊर्जा आहे आणि प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.” तिच्या या वक्तव्यामुळे ‘मंजुळा’ गाण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
सालबर्डी हा चित्रपट दुर्गम भागातील एका गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून त्यात भय, रहस्य आणि थरार यांचा संगम पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केले आहे. निर्माते अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव आहेत.
या मल्टीस्टारर चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे आणि अंशुमन विचारे यांसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
एकूणच, दमदार संगीत, आकर्षक नृत्यरचना आणि सोनालीचा झिंग आणणारा अंदाज यामुळे ‘मंजुळा’ हे गाणं प्रेक्षकांसाठी व्हिज्युअल ट्रीट ठरणार आहे. आता ‘सालबर्डी’ चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










