केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा; महाराष्ट्रातील बारामती, राहुरीतही पोटनिवडणूक जाहीर
नवी दिल्ली / वृतसंस्था :
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांची आणि पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचीदेखील घोषणा करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीदेखील घोषणा यावेळी करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. आसाम, केरळ आणि पदुच्चेरी या तीनही ठिकाणी एकाच दिवशी मतदान होणार आहे. तीनही ठिकाणी 9 एप्रिलला मतदान होईल. तर 4 मे ला निकाल जाहीर होतील. तामिळनाडूतही एकाच टप्प्यात निवडणूक होईल. तामिळनाडूमध्ये सर्व 234 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होईल. तर 4 मे रोजी निकाल जाहीर होतील.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडेल. पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडेल. तर दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान पार पडेल. यानंतर 4 मे रोजी मतमोजणी होईल.
आसाममध्ये 126 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होईल. आसाममध्ये 9 एप्रिलला सर्व 126 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर 4 मे रोजी निकाल जाहीर होतील. या निवडणुकीसाठी सर्व उमेदवार हे 23 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकणार आहेत. तर 26 एप्रिलला अर्ज मागे घेता येईल.
बारामती आणि राहुरी मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा
या व्यतिरिक्त गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड, त्रिपुरा राज्यातील पोटनिवडणुकांची देखील घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात राहुरी आणि बारामती या दोन मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुल विधानसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होईल आणि 4 एप्रिलला निकाल जाहीर होतील, असं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार 30 मार्च ते 6 एप्रिल 2026 या काळात उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात. तर 9 तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख राहणार आहे. यानंतर 23 एप्रिलला मतदान पार पडेल.
राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचं 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं होतं. त्यामुळे राहुरीची जागा रिक्त आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर आता बारामती विधानसभेसाठी देखील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहुरी आणि बारामतीत आता बिनविरोध निवडणूक होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.










