- जाहिरात -spot_img
breaking news

कल्याण-नगर-परळी रेल्वेमार्गासाठी माळशेज कृती समिती मैदानात; सर्वपक्षीय संघर्ष उभारणार

 

रेल्वेचा त्रिकोण पूर्ण करण्याची मागणी
पारनेर | नगर सह्याद्री
पुणे व नाशिक या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या शहरांना जोडणाऱ्या पुणे-शिरूर-अहिल्यानगर-शिड-सिन्नर-नाशिक रेल्वेमार्गाला केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. याबद्दल माळशेज रेल्वे कृती समितीच्या वतीने सरकारचे अभिनंदन करण्यात आले. या मंजुरीनंतर आता मुंबई-लातूर महामार्गाला समांतर असणाऱ्या कल्याण-मुरबाड-माळशेज-शिवनेरी-वासुंदेमार्गे अहिल्यानगर रेल्वेमार्गाला मंजुरी देऊन हा रेल्वेचा त्रिकोण पूर्ण करावा, अशी मागणी समितीने केली आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास देशाची पश्चिम व पूर्व किनारपट्टी थेट मुंबई ते विशाखापट्टनम अशी जोडली जाईल. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मुंबईशी जोडणारा देशातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प साकार होईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.

या रेल्वे प्रकल्पामुळे बीड, परळी, अहिल्यानगर, जुन्नर आणि मुरबाड परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे. अकोले व संगमनेरच्या डोंगराळ भागाचा कायापालट होऊन माळशेज, शिवनेरी, लेण्याद्री आणि भीमाशंकर परिसरात पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळेल, ज्यामुळे रोजगार निर्मिती होईल. तसेच साखर, भाजीपाला व फळे मुंबईमार्गे थेट देश-विदेशात निर्यात करणे शक्य होणार आहे. मुंबई-ठाणेची श्रीमंती, पुण्याची विद्वत्ता आणि अहिल्यानगरचा सहकार या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्राच्या प्रगतीचे नवे पर्व सुरू होईल.

स्वातंत्र्यसेनानी स्व. गोविंदभाई श्रॉफ, स्व. केशरकाकू क्षीरसागर, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या प्रकल्पाची मागणी केली होती. माळशेज रेल्वे कृती समिती सन 1996 पासून यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून, निर्धार मेळावे, रथयात्रा आणि 5 लाख स्वाक्षऱ्यांची मोहीम यापूव राबवण्यात आली आहे. 2006 मध्ये याचे सर्वेक्षण झाले आणि 2019 मध्ये मुरबाडपर्यंत पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली. हा पहिला टप्पा मढ-शिवनेरीपर्यंत वाढवणे व्यावहारिकदृष्ट्‌‍या सोयीचे ठरेल. या लढ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार व अण्णा हजारे यांचे आशीर्वाद लाभले आहेत.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण हितासाठी कल्याण-अहिल्यानगर या ‌‘थर्ड घाट रेल्वे प्रोजेक्ट‌’च्या मंजुरीसाठी भविष्यात बीड व परळीपासून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आणि तरुणांना संघटित करून तीव्र संघर्ष उभारण्याचा निर्धार कृती समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलवळे, उपाध्यक्ष मुरलीधर गुंजाळ, दादा भालेकर आणि मिलिंद गंधे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वैभव काळे देखील उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने साकळाईचे स्वप्न पूर्ण होणार - ना. विखे पाटील

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ