महिलांसह नागरिकांचे राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन
संगमनेर | नगर सह्याद्री
शहरातील टॉप टेन इम्पेरियल सेंटर येथे प्रस्तावित वाईन शॉप स्थलांतरास स्थानिक नागरिक, महिला व व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवित राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन दिले आहे. टॉप टेन इम्पेरियल येथील स्थानिक व्यापारी, व्यावसायिक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांची भेट घेत सदर वाईन शॉपला विरोध करत कोणत्याही परिस्थितीत वाईन शॉप संगमनेरमध्ये सुरू होऊ नये, यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती.
नागरिकांच्या भावनेचा आदर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने राज्य उत्पादन शुल्क येथील अधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले. संबंधित जागा ही व्यापारी संकुलामध्ये असून येथे मोठ्या प्रमाणात महिला, ज्येष्ठ नागरिक व कुटुंबीयांची वर्दळ असते. अशा ठिकाणी वाईन शॉप सुरू झाल्यास परिसरातील सुरक्षितता, सामाजिक वातावरण व व्यावसायिक हितसंबंधांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
संबंधित कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांनी यापूवच एकमताने अशा प्रकारच्या व्यवसायाला विरोध दर्शविला आहे. वाईन शॉपमुळे परिसरात गद वाढून वाहतूक, पार्किंग आणि कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. याठिकाणी महिलांसाठी अनेक व्यावसायिक दुकाने देखील आहेत. महिलांची छेडछाड होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो म्हणूनच सदर वाईन शॉपला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होत्या.
महिलांनी आपल्या व्यथा राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संगमनेर यांच्यासमोर मांडल्या. सदर वाईन शॉप जर संगमनेरात आले तर आम्ही रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ, भाजप महायुती सरकारने आहे ती दारूची दुकाने बंद केली पाहिजे, या दारूमुळे आमचा संसार उघड्यावर आला असेही महिलांच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित वाईन शॉपला स्थलांतराची परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
याप्रसंगी अमर कतारी, आसिफ तांबोळी, फैसल सय्यद, अमोल डुकरे, श्रीकांत खिची, त्रिलोक कतारी, शुभम काळे, महिला आघाडीच्या आरती मसराम, लक्ष्मी खिची, रोशन गायकवाड, साधना शिवलकर, सुगरिता खीची, मोहिनी कतारी यांच्यासह स्थानिक महिला, नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










