गुंड सागर मोहळकरवर सहा राउंड केले फायर
जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर (वय ३२, रा. जामवाडी, जामखेड) याच्यावर सोमवारी सायंकाळी थरारक गोळीबार झाला. नुरानी कॉलनी रस्त्यावर साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून अंधाधुंद फायरिंग केली. माहितीनुसार पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आले असून मोहळकरला चार गोळ्या लागल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या मोहळकरला प्रथम जामखेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढे नगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, आज सकाळी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आल्याची अधिकृत माहिती सुत्रांनी दिली.
महिनाभरापूर्वीच जामिनावर बाहेर आलेल्या सागर मोहळकरवर जिवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तो काही काळ नाशिक कारागृहात होता आणि महिनाभरापूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. त्याच्या सुटकेनंतर शहरात तणावाचे वातावरण असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर झालेल्या गोळीबारामुळे गुन्हेगारी वर्तुळातील जुना वाद पुन्हा चिघळल्याची शयता वर्तवली जात आहे.घटनेनंतर नुरानी कॉलनी व आसपासच्या भागात काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला असून उउढत फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. जामखेडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली असून, या प्रकरणामुळे गुन्हेगारी टोळ्यांतील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता पोलीस तपासातून नेमका हल्ल्यामागचा सूत्रधार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.सागर मोहळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता.
त्याच्यावर यापूर्वी ३०७सह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनी त्याच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. मोहळकर हा नशेच्या आहारी गेलेला असून जामखेड परिसरात त्याची दहशत असल्याची चर्चा आहे.










